बीएसएनएलच्या जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवा
By Admin | Updated: August 1, 2015 01:51 IST2015-08-01T01:51:45+5:302015-08-01T01:51:45+5:30
अविरतपणे दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या बीएसएनएल या केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या मोबाईल कंपनीच्या मालकीच्या जागेवर...

बीएसएनएलच्या जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवा
अमरावती : अविरतपणे दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या बीएसएनएल या केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या मोबाईल कंपनीच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून ही जागा हडपयाचा डाव रचला जात आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून ही जागा कायम ठेवावी, अशी मागणी शुक्रवारी बीएसएनएल कर्मचारी ज्युनिअर्स व अधिकारी संघटनेने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
भारतीय दूरसंचार निगमच्या मालकीच्या जागेवरील भिंत तोडून अतिक्रमण केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील क्रांती कॉलनीजवळील मार्गावर उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपविभागीय अभियंता प्रवीण देवीदास इसोकार यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सातुर्णाजवळील क्रांती कॉलनी मार्गावर बीएसएनएलची सर्व्हे क्रमांक ४९/२ यातील ०.८ आर जमीन असून तेथील जागेवर बीएसएनएलमार्फत ६२ मिटरची संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. मात्र ती भिंत तोडून तेथे सिमेंट क्राँक्रीटचे पिल्लर उभारण्यात आले आहेत.
शासनाच्या मालकीची ही जागा हडपरण्याचा प्रयत्न होत आहे. शहरातील २ एकर शासकीय जागा आहे. त्या जागेवर भिंत पाडून जागा हडप करून बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या संबंधिताविरूध्द प्रशासनाने योग्य कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी आर. एस. राऊत, एस.एच गावंडे, पि.जी. वानखडे, डी.एच भगत, एस एम बालापुरे, बीएसएनएलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)