संत गजानन महाराजांची प्रतिमा हटविली

By Admin | Updated: August 27, 2016 00:03 IST2016-08-27T00:03:43+5:302016-08-27T00:03:43+5:30

राजकमल चौकातील ऐतिहासिक श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा खापर्डेवाडा पाडण्याचा घाट काही विघ्नसंतोषी लोकांकडून रचला जात आहे.

The image of Saint Gajanan Maharaj was deleted | संत गजानन महाराजांची प्रतिमा हटविली

संत गजानन महाराजांची प्रतिमा हटविली

खापर्डेवाड्यातील प्रकार : रोज पाडली जाते वाड्याची भिंत, भक्तांमध्ये नाराजी
संदीप मानकर अमरावती
राजकमल चौकातील ऐतिहासिक श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा खापर्डेवाडा पाडण्याचा घाट काही विघ्नसंतोषी लोकांकडून रचला जात आहे. बुधवारी अज्ञाताने या वाड्यातील काही साहित्य काढून नेले. समाजकंटक इतक्यावरच थांबले नसून वाड्यातील ज्याठिकाणी साक्षात गजानन महाराज बसले होते, त्या चौथऱ्यावर भक्तांद्वारे विधिवत प्रतिष्ठापित श्रींची प्रतिमा हटविण्याचा प्रतापही त्यांनी केला आहे. ही बाब भाविकांच्या लक्षात येताच श्रींच्या भक्तांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
गुरूवारी काही भक्त येथे पूजा करण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. यापूर्वी येथील औदुंबराचे झाड अमानुषपणे तोडण्यात आले. परंतु येथे शेगावनिवासी संत गजानन महाराजांनी वास्तव्य केल्यामुळे येथे भक्तांचा राबता असतो. परंतु कंत्राटदाराच्या आदेशानुसारच येथून महाराजांची प्रतिमा काढल्याचा संशय श्रींच्या भक्तांनी व्यक्त केला आहे.
हा वाडा खासगी कंत्राटदाराने विकत घेतल्याची माहिती आहे. या कंत्राटदारानेच या वाड्यात प्रवेशबंदीचे फलक लावले आहेत. तरीही येथे येऊन भाविक येथील चौथऱ्यावर स्थापित संत गजानन महाराजांच्या प्रतिमेची दर गुरूवारी पूजा-अर्चना करीत होते. पण, काही विघ्नसंतोषी लोकांना ते आवडले नाही. याठिकाणी संत गजानन महाराजांचे मंदिर व्हावे, अशी अनेक दिवसांपासून श्रींच्या भक्तांची मागणी आहे. या वाड्याला ऐतिहासिक महत्त्व असून ख्यातनाम वकील दादासाहेब खापर्डे हयात असताना येथूनच अनेक देशभक्तांच्या चळवळी झाल्या आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वाड्याचे जतन व्हावे, अशी भाविकांची व अंबानगरीतील नागरिकांची मागणी आहे.
वाडा पाडण्याचा घाट
येथील ऐतिहासिक इमारत थोडी-थोडी रोज पाडली जात आहे. याकडे पोलिसांचे व महापालिकेचे दुर्लक्ष असून अंबानगरीतील हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा की नाही? यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु हा वाडा एका कंत्राटदाराने दादासाहेबांच्या नातवांकडून खरेदी केल्याचे समजते. त्यामुळे वाड्याच्या परिसरात नागरिाकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून तसे फलकही लावण्यात आले आहेत.
वाडा सुस्थितीत असतानाही शिकस्त दाखविण्याचा प्रयत्न ?
हा वाडा सध्याही सुस्थितीत आहे. वाड्याच्या मागच्या भिंतीचे अवलोकन केल्यास इमारतीचे बांधकाम किती मजबूत आहे, हे लक्षात येते. खुद्द कंत्राटदाराकडूनच ही इमारत जीर्ण झाल्याचे दाखविले जात आहे. महापालिकेने ही इमारत क्षतिग्रस्त आहे की नाही, याची पाहणी करण्याची जबाबदारी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे दिली होती. पण, राजकीय दबावात येऊन येथील प्राचार्यांनी महापालिकेला चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. हे प्रकरण थंडबस्त्यात पडले.
संत गजानन महाराज हे केवळ वैदर्भीयांचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो जनांचे आराध्य आहेत. त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक मंदिरात भक्तांचा सतत राबता असतो. मात्र, ज्याठिकाणी महाराजांचा पदस्पर्श झाला, जेथे महाराजांनी काही काळ विश्राम केला, त्याठिकाणी त्यांची प्रतिमादेखील सुरक्षित राहू शकत नाही, याबाबत भक्तांनी प्रचंड खेद व्यक्त केला आहे.

औदुंबराचे
झाडही तोडले?
भक्तांच्या अनेक आठवणी या वाड्याशी जुळलेल्या आहेत. याठिकाणी ऐतिहासिक औदुंबराचे झाड होते. हे झाडसुद्धा विघ्नसंतोषी लोकांनी तोडून टाकले. येथे जुनी विहीर आहे. झाडाजवळच्या चौथऱ्यावर संत गजानन महाराज बसले होते. त्यामुळे या जागेला आध्यात्मिक महत्त्व आहे.

Web Title: The image of Saint Gajanan Maharaj was deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.