रस्त्यांच्या खड्ड्यांत पालकमंत्र्यांची प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 00:01 IST2018-07-19T00:01:01+5:302018-07-19T00:01:28+5:30
महानगरात रस्त्यांची चाळण झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी युवा स्वाभिमान संघटनेने बुधवारी पंचवटी चौकात पालकमंत्री प्रवीण पोटे यांची प्रतिमा खड्ड्यात रोवून अभिनव आंदोलन केले.

रस्त्यांच्या खड्ड्यांत पालकमंत्र्यांची प्रतिमा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महानगरात रस्त्यांची चाळण झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी युवा स्वाभिमान संघटनेने बुधवारी पंचवटी चौकात पालकमंत्री प्रवीण पोटे यांची प्रतिमा खड्ड्यात रोवून अभिनव आंदोलन केले.
शहरात रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. याला सार्वजनिक बांधकाम विभागासह पालकमंत्री प्रवीण पोटे जबाबदार असल्याचा आक्षेप युवा स्वाभिमान संघटनेने घेतला आहे. आठ दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास पालकमंत्र्यांच्या निवासस्थानापुढे खड्डे खोदून आंदोलन केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे असताना, त्यांच्याच गृहक्षेत्रात रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचे पाठबळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही मार्गांवर चक्क पावसात बांधकाम विभागाने डांबरीकरण करीत खड्डे बुजविण्याचे नाटक वठविले. सीमेंट काँक्रीटीकरणदेखील करण्यात येत आहे. हा सार्वजनिक बांधकाम विभाग निधीचा अपव्यय असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. आंदोलनाप्रसंगी अंकुश ठाकरे, अभिजित देशमुख, मंगेश कोकाटे, अमर काळमेघ, शंकर काळमेघ, प्रतीक पाटील, गोपाल वंजारी, उज्ज्वल बालाधरे, तेजस महल्ले, दिनार फुके, अभिजित काळमेघ, रौनक किटुकले, अजमत खान, प्रथमेश राठोड, आयूष ठाकरे, हेरम दावरे, शंतनू नागे, सूयश कोकाटे, प्रथमेश अढाऊ, मयूर गोटखडे, संगम उंबरकर आदी होते.
बडनेरासह रिंगरोडपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. पंचवटी चौकात रस्त्यावर खड्डे नाही. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी आंदोलन कसे झाले, हे माहिती नाही.
- सदानंद शेंडगे
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग