कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक
By Admin | Updated: March 27, 2017 00:10 IST2017-03-27T00:10:50+5:302017-03-27T00:10:50+5:30
गोवंश हत्या बंदी कायदा असतानासुद्धा गोवंशाची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे.

कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक
तस्करी : अपघातामुळे उघड झाली माहिती
वरूड : गोवंश हत्या बंदी कायदा असतानासुद्धा गोवंशाची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. शुक्रवारी पुसला-धानोेड मार्गावर झालेल्या ट्रक अपघातामुळे ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद फरहान कुरेशी मोहम्मद हसीब (२७ रा. बुधवारा भोपाळ म.प्र.) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
शुक्रवारी मध्यप्रदेशाची राजधाणी भोपाळवरून पांढूर्णामार्गे वरूडकडे येणारा ट्रक क्र. एमपी १३ जीए ५८४७ मधून २० गोऱ्हयांना कोंबून वरून ताडपत्री झाकून आणण्यात येत होता. याची माहिती शेंदूरजनाघाट पोलिसांना मिळाली. त्यांनी या ट्रकचा पाठलाग केला असता पुसला-धानोड मार्गावरील एका झाडावर आदळून ट्रकचा अपघात झाल्याचे दिसून आले. या ट्रकमध्ये कोंबण्यात आलेल्या सहा जनावरांचा मृत्यू झाला होता तर काही जनावर बेशुद्ध झाली होती. या प्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. शेंदूरजनाघाट पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पीएसआय आशिष गंद्रे, एपीआय विजय लेवलकर, लक्ष्मण साने, गणेश पोराटे, पंकज गावंडे यांनी घटनेचा पंचनामा केला.
जनावरांसह ट्रक असा एकूण ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी )
गुटखा, वन्यप्राण्यांच्याही तस्करीत वाढ
पांढुर्णा-वरूड रस्त्यावर परिवहन विभागाचा सीमा तपासणी नाका नसल्याने या राज्य महामार्गावरून मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या तस्करीचे प्रकार वाढले आहे. रेतीवाहतूकदारसुद्धा राजारेसपणे रेतीची वाहतूक करतात, तर गुटखा, गोवंश, तसेच वन्यप्राण्यांचे मांस, अवैध वस्तूची मोठ्या प्रमाणावर तस्करी वाढली आहे.