अवैध रेती वाहतूक; सहा ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST2021-01-15T04:11:41+5:302021-01-15T04:11:41+5:30
महसूलची कारवाई : महसूल गप्प, नदीपात्र पोखरले अंजनगाव सुर्जी : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या शहानूर नदीपात्रासह तालुक्यात अनेक नदीपात्र रेती ...

अवैध रेती वाहतूक; सहा ट्रक जप्त
महसूलची कारवाई : महसूल गप्प, नदीपात्र पोखरले
अंजनगाव सुर्जी : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या शहानूर नदीपात्रासह तालुक्यात अनेक नदीपात्र रेती तस्करांनी पोखरले आहे. नदीपात्रातील रेतीचे अवैध उत्खनन करून बिनदिक्कतपणे वाहतूक केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी दर्यापूर मार्गावरून रेतीची अवैध वाहतूक करणारे सहा ट्रक चौकशी व तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. महसूल विभागाच्या लेखी त्या ट्रकमधून होणारी रेती वाहतूक वैध की, अवैध हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महसूल विभागाने चौकशीकरिता ताब्यात घेतलेले सहा ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. ही कारवाई क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक होत असल्याच्या संशयावरून करण्यात आली. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. चौकशीसाठी तहसील कार्यालयात आणलेल्या सहा ट्रकपैकी दोन ट्रक वाशिम जिल्ह्यातील किणखेडा येथील आहेत. एमएच ३७ जे १४७६ चा चालक बाबुराव मोरे, एमएच ३७ जे १३७० चा चालक संतोष भुसारी, एमएच ४० बीएल ९५८७ चा चालक दुर्गेश संतुलाल पराते (रा. कोठारा, अचलपूर), एमएच १२ एमव्ही ०७९५ चा चालक उमर आबिद (रा. शहापुरा, अंजनगाव), एमएच २७ बीएक्स ३९०५ व एमएच ३० बीडी ३३३९ या ट्रकचा चालक करिम शहा आलम शहा (रा. शेलगाव, जि. बुलडाणा) यांनादेखील थांबविण्यात आले आहे. अंजनगाव सुर्जीचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांच्या नेतृत्वात ही कारवाई नायब तहसीलदार मंगेश सोळंके, मंडळ अधिकारी पिंपळकर पटवारी गवई, पटवारी उईके व सहकर्मचारी यांनी केली.