रिलायन्स ट्रेन्ड्सचे सरकारी जागेवर अवैध पार्किंग
By Admin | Updated: November 6, 2016 00:07 IST2016-11-06T00:07:24+5:302016-11-06T00:07:24+5:30
कुबडे हाईटस्ने वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने रिलायन्स ट्रेन्ड्सने सरकारी मालमत्तेवर पार्किंगचा डाव रचला आहे.

रिलायन्स ट्रेन्ड्सचे सरकारी जागेवर अवैध पार्किंग
अपघाताची शक्यता : जबाबदारी कुणाची ?
अमरावती : कुबडे हाईटस्ने वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने रिलायन्स ट्रेन्ड्सने सरकारी मालमत्तेवर पार्किंगचा डाव रचला आहे.
महागडे कपडे व अन्य चीज वस्तू विकून अमरावतीकरांच्या खिशावर डल्लाही हेच मारणार! आणि सरकारी जागेवर अतिक्रमण करून पार्किंग उपलब्धतेचा आवही आणणार, असा रिलायन्स ट्रेन्ड्सचा एकूणच खाक्या आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून रिलायन्स ट्रेन्ड्सने वर्दळीच्या ठिकाणी मोक्याची जागा पटकावली खरी. मात्र, पार्किंग उपलब्धतेला त्यांनी थेट फाटा दिला. कुबडे ज्वेलर्ससमोर असलेल्या सरकारी जागेवर कुबडेंनी चारचाकी वाहने लावायच्या, त्यापुढे फेरीवाले व त्यापुढे रिलायन्स ट्रेन्ड्सच्या ग्राहकांची वाहने लावायची, अशी अजब तऱ्हा प्रतिष्ठानाने अवलंबविली आहे.
फुटपाथ गडप
अंबादेवी मार्गावरील कुबडे हाईट्सने समोरील फूटपाथ गडप केला आहे. दुकानासमोरील मोकळ्या जागेत दहा ते बारा चारचाकी वाहने मुद्दामहून पार्क केली जातात. त्यामुळे ग्राहकांना नाईलाजाने चारचाकी वाहनांच्या मागे वाहने पार्क करावी लागतात. यामुळे या क्षेत्रात अपघाताची शक्यता वाढली आहे.