लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : महाराष्ट्रात गौण खनिज वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने मध्यप्रदेशातील तस्करांचे चांगलेच फावले आहे. महाराष्ट्रातील रेतीचा अवैध उपसा करून मध्य प्रदेशातील रामाखेडा या गावात साठा करून त्याची बोगस ई-वाहतूक पासद्वारे विक्री करण्यात येत आहे.रामाखेडा गावाजवळून वाहणाऱ्या तापी नदीपात्रात एकाच वेळी ५० ते ६० ट्रॅक्टर रेती वाहून नेण्यासाठी उतरले असल्याचे निदर्शनास आले. त्या नदीपात्रातून काढलेली रेती काठावरील उंच ठिकाणी विस्तीर्ण जागेत साठविण्यात येते. दररोज जवळपास एक हजार ब्रास रेती तापी नदीपात्रातून काढली जात आहे. घटनास्थळावर ट्रॅक्टरची यात्रा भरल्यासारखी स्थिती होती. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी १० ते १५ दुचाकीस्वार युवकांचे टोळके तैनात होते. या परिसरात येणाऱ्यांना प्रथम आपण कोण, कोणत्या वृत्तपत्रासाठी आले, अशी विचारणा केली जाते. यानंतर संबंधित कंत्राटदारांच्या अधिनस्थ स्थानिक देखरेख करणाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीवर विचारपूस केली जाते.आम्ही गाळत असलेली रेती हे शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन नव्हे. संपूर्ण जिल्ह्यातील रेतीचे कंत्राट आम्ही घेतले असून, आम्हाला कुठूनही रेती वाहून नेण्याचा अधिकार आहे, असा जबाब उपस्थित टोळक्यातील काहींनी दिला. सदर प्रतिनिधीने नदीपात्रातील रेतीघाटात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अत्यंत अवघड असलेल्या रस्त्यातून रेतीघाटापर्यंत पोहोचता आले नाही. याशिवाय कोणत्याही क्षणी या टोळक्यांकडून अघटित घडण्याची शक्यता होती.रामाखेडा येथे साठविलेली रेती ट्रॅक्टरमध्ये भरून देडतलाई गावात आणले जातात. तेथे संगणक केंद्रावरून ई-वाहतूक पास तयार केला जातो. वाहतूक पासमध्ये मेलचुका या घाटातून रेती आणल्याचे उल्लेख असून, त्याचे अंतर ३२ किलोमीटर दाखवण्यात येते. यासाठी वाहतूक कालावधी १ तास ५ मिनिटे, असा नमूद केला जातो. ई-वाहतूक पास मिळताच रेतीने भरलेला ट्रॅक्टर सुसाट धारणीकडे निघतात. देडतलाई येथून निघालेले ट्रॅक्टर मध्य प्रदेशातील भोकरबर्डी या सीमेवरील गावात धडकतात. तेथे वन तपासणी नाका आहे. त्या नाक्यावर प्रत्येक रॉयल्टीची तपासणी केले जाते आणि त्याची नोंद घेऊन किती वाजता धारणीकडे निघाला, याची वेळसुद्धा नोंदविण्यात येते. भोकरबर्डी नाक्यावर येण्यापूर्वी व देडतलाईपूर्वी आरटीओ नाका आहे. तेथे ट्रॅक्टरची चौकशी होत नाही. रेतीच्या या अवैध धंद्याकडे मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तापी नदीचे उदर पोकळ आणि प्रवाह वेगवान झाल्याने पर्यावरणाचा ºहास होत आहे. शिवाय लाखोंची रॉयल्टीदेखील शासनाला मिळत नसल्याच्या पर्यावरणवाद्यांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या रेती तथा रॉयल्टीची योग्य चौकशी करण्यात येईल. यात कोणतीही अनियमितता आढळल्यास नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल .- मिताली सेठी, उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, धारणी
तापी नदीपात्रात अवैध उत्खनन जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 5:00 AM
रामाखेडा येथे साठविलेली रेती ट्रॅक्टरमध्ये भरून देडतलाई गावात आणले जातात. तेथे संगणक केंद्रावरून ई-वाहतूक पास तयार केला जातो. वाहतूक पासमध्ये मेलचुका या घाटातून रेती आणल्याचे उल्लेख असून, त्याचे अंतर ३२ किलोमीटर दाखवण्यात येते. यासाठी वाहतूक कालावधी १ तास ५ मिनिटे, असा नमूद केला जातो. ई-वाहतूक पास मिळताच रेतीने भरलेला ट्रॅक्टर सुसाट धारणीकडे निघतात.
ठळक मुद्देदररोज हजार ब्रास : ५०-६० ट्रॅक्टरमधून वाहतूक, बनावट ई-पासचा वापर