‘त्या’ खाणीतील अवैध उत्खनन आणि ब्लास्टिंगमुळे नागरिकांचा जीव टांगणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST2021-09-21T04:14:50+5:302021-09-21T04:14:50+5:30

अमरावती : शहराच्या पूर्वेकडील मासोद परसोडा या भागात सुरू असलेल्या खाणीतून गौण खनिजाचा नुसता अवैध उपसाच होत नाही आहे, ...

Illegal excavation and blasting of 'those' mines claimed the lives of citizens! | ‘त्या’ खाणीतील अवैध उत्खनन आणि ब्लास्टिंगमुळे नागरिकांचा जीव टांगणीला!

‘त्या’ खाणीतील अवैध उत्खनन आणि ब्लास्टिंगमुळे नागरिकांचा जीव टांगणीला!

अमरावती : शहराच्या पूर्वेकडील मासोद परसोडा या भागात सुरू असलेल्या खाणीतून गौण खनिजाचा नुसता अवैध उपसाच होत नाही आहे, तर या भागातील ग्रामिणांचे जीवन धोक्यात आले आहे. अवैध उत्खनन, परवानगी नसलेल्या यंत्रांचा वापर आणि शासकीय जमिनीवर सुरू असलेल्या उत्खननातून शासनाचा महसूलदेखील मोठ्या प्रमाणात बुडत असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. याशिवाय ज्या जिलेटीनच्या कांड्यांमुळे मुंबई गाजली, त्या जिलेटीनच्या कांड्यांचा वापर या खाणीत होत असून पोलीस प्रशासनापुढे ते थांबवण्याचे आव्हान आहे. विशेष म्हणजे, या खाणीसाठी चार हेक्टरहून अधिक शासकीय जमिनीचा वापर होत आहे. जिल्हा खनिकर्म विभागाच्या सूत्रांनुसार, जास्तीत जास्त २४ मीटर जमिनीचे उत्खनन करण्याची परवानगी आहे. मात्र, या ठिकाणी त्याहून अधिक जमीन खोदली जात आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील नागरिकांनी आमदार रवि राणा यांच्यासमक्ष आपली कैफियत मांडली. होणाऱ्या त्रासातून सुटका व्हावी, यासाठी विनंती केली. त्यानंतर राणा यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या दालनात बैठक घेतली. या परिसरात नीलेश चौरसिया अँड कंपनी यांची खाण आहे. या खाणीतून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा अवैध उपसा होत असताना खनिकर्म विभाग निद्रावस्थेत आहे. त्यांना मिळणाऱ्या कमिशनमुळे खनिकर्म अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आमदार रवि राणा यांनी यावेळी केला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा गावकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. रवि राणा यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेकाम, जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, विनोद जायलवाल, पंचायत समितीचे सदस्य रश्मी घुले, मीनल डकरे, आशिष कावरे, अजय घुले, सरपंच राजेंद्र खंडार, सूरज काळबांडे, संजय भलावी, शैलेश काळबांडे, प्रशांत चांभारे, अजय गवळी, अविनाश काळे, भास्करराव धानोरकर आदी उपस्थित होते

खदान मालकाची अरेरावी

शासकीय नियम धाब्यावर बसवून परवानगी नसलेल्या यंत्रांद्वारे जमिनीत खोल खड्डे केले जातात. त्यामुळे गावातील विहिरींचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्याने विहिरीतील जलसाठा संपला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याचे गावकऱ्यांनी आ. राणा यांना सांगितले. याबाबत खदान मालकाकडे तक्रार केली असता, ते अरेरावी करीत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. खोल खड्ड्यात पाणी साचल्यामुळे गावालगतच्या परिसराला धोका असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

--------------------

ब्लास्टिंगसाठी जिलेटिनचा वापर

खाणीतून उत्खनन करण्यासाठी जिलेटिनचा वापर करणे अवैध असल्याची आ. रवि राणा यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. मध्यरात्री जिलेटीनच्या कांड्या जमिनीत पुरून सकाळी ब्लास्ट केला जातो. त्यामुळे नागरिकांच्या घराला हादरे बसतात. अनेक घरांना भेगाही पडल्या आहेत. मात्र, कुणालाही न जुमानता जिलेटिनचा सर्रास वापर होत आहे.

कोट-

या भागातील खाणीत अवैधरीत्या बोअर ब्लास्टिंग होत असून ही खाण तातडीने बंद करावी, त्या ठिकाणच्या सर्व मशीन जप्त करून खाणमालकाविरुद्ध कारवाई करण्यात यावी.

- रवि राणा, आमदार

Web Title: Illegal excavation and blasting of 'those' mines claimed the lives of citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.