विनोद शिवकुमार याच्या जामिनासाठी ‘आयएफएस’ लॉबी एकवटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:13 IST2021-03-31T04:13:24+5:302021-03-31T04:13:24+5:30
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला जामीन मिळण्यासाठी भारतीय ...

विनोद शिवकुमार याच्या जामिनासाठी ‘आयएफएस’ लॉबी एकवटली
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला जामीन मिळण्यासाठी भारतीय वन सेवा (आयएफएस) लॉबी एकवटली आहे. धारणी पोलिसांनी विनोद याला मंगळवारी कनिष्ठ न्यायालयात हजर केले असता, त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र, आराेपी विनोद शिवकुमार याला त्वरेने जामीन मिळावा, यासाठी नामांकित वकील ठेवण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आहे.
उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याच्या समर्थनार्थ आयएफएस लॉबी सक्रिय झाली आहे. बंगळुरू येथून काही जण विनोद शिवकुमार याच्यासाठी अमरावतीत ठाण मांडून आहेत. अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयात येत्या काही दिवसांत विनोद याला जामीन जामीन मिळावा, यासाठी वकिलांची चमू उभी करण्यात येणार आहे. आरोपी विनोद याच्यासाठी पैशाचे कलेक्शनसुद्धा जोरात सुरू झाल्याची माहिती वनसूत्रांकडून मिळाली आहे.
--------------------------
विनोद शिवकुमारचा अंध विद्यालयात मुक्काम
धारणी कनिष्ठ न्यायालयाने आरोपी विनोद शिवकुमार याला मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याची कोरोना चाचणी करून येथील अंध विद्यालयात उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहात रवानगी केली. विनोद शिवकुमार याची कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र तपासले आणि त्यानंतरच त्याला कारागृहात प्रवेश देण्यात आला. मास्क असल्याबाबतची चाचपणी करण्यात आली. सामान्य बंदीजनांप्रमाणे विनोद शिवकुमार याच्या शरीरावरील डाग, व्रण यांसह संपूर्ण नाव, पत्ता, नोकरी आदी माहितीची नोंद करण्यात आली. कारागृहाचे शिपाई ही माहिती घेत असताना आरोपी विनोद याला खाली बसून ठेवण्यात आले होते. पहिल्या दिवशी बंदी म्हणून त्याला सामान्य बराकीत ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.