रेल्वेच्या राखीव डब्यात प्रवास केल्यास तुरुंगात जाणार
By Admin | Updated: July 6, 2017 00:25 IST2017-07-06T00:25:26+5:302017-07-06T00:25:26+5:30
रेल्वे गाड्यात महिला, सैनिक, अपंगासाठी राखीव असलेल्या डब्यात सामान्य प्रवाशांनी प्रवास केला तर आता तुरुंगात जावे लागेल,...

रेल्वेच्या राखीव डब्यात प्रवास केल्यास तुरुंगात जाणार
आरपीएफकडे कारवाईची जबाबदारी : महिला, अपंग, सैन्यांसाठी रेल्वेत डबे राखीव
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे गाड्यात महिला, सैनिक, अपंगासाठी राखीव असलेल्या डब्यात सामान्य प्रवाशांनी प्रवास केला तर आता तुरुंगात जावे लागेल, अशी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे फर्मान रेल्वे मंत्रालयाने जारी केले आहे. राखीव डब्यात त्याच व्यक्तींना प्रवास करण्याची मुभा असून रेल्वे सुरक्षा दलाकडे कारवाईचे सूत्रे देण्यात आली आहेत.
दळणवळणाचे सर्वात मोठे जाळे असलेल्या रेल्वेमध्ये अनेक सकारात्मक बदल होत आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न चालविला असताना प्रवासी केंद्रबिंदू मानून अनेक उपक्रम राबविले जात आहे. परंतु ज्या संवर्गासाठी रेल्वे गाड्यात डबे राखीव आहेत त्या डब्यांमध्ये अन्य प्रवाशांची घुसखोरी वाढत असल्याच्या तक्रारी सैनिकांनी केल्या आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये सैनिकांसाठी अर्धा डबा राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र या डब्यांमध्ये रेल्वे कर्मचारी अथवा अन्य प्रवासी ये-जा करीत असल्याची ओरड आहे. एवढेच नव्हे तर भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या राखीव डब्यात अन्य प्रवाशांची घुसखोरी रोखण्याची मागणी रेल्वे विभागाकडे केली आहे. तसेच महिला राखीव डब्यातही प्रसंगी अन्य प्रवाशी प्रवास करीत असल्याचे चित्र आहे. महिलांना रेल्वे गाड्यात सुरक्षित प्रवास करण्यासाठी राखीव डबे असूनही महिलांना रेल्वेत सुरक्षित प्रवास करता येत नसल्याचे वास्तव आहे. राखीव डब्यांमध्ये प्रवासी असुरक्षिततेचा मुद्दा देशपातळीवर गाजत असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या डब्यात अन्य प्रवासी आढळल्यास दंडात्मकसह कठोर कारवाईची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर सोपविली आहे. त्याअनुषंगाने मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या प्रबंधकांचे पत्र स्टेशन प्रबंधक, रेल्वे सुरक्षा दलाच्या निरिक्षकांना पाठविण्यात आले आहे. डब्यात सुरक्षितता अथवा कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित प्रवाशाला कारागृहाची वारी करावी लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे राखीव डब्यांमध्ये प्रवाशांची सुरक्षितता जपण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर सोपविण्यात आली आहे.
तर ५०० रुपये दंड, तपासणी मोहीम
महिला, अपंग अथवा सैनिकांसाठी राखीव असलेल्या डब्यात प्रवास करताना अन्य प्रवासी आढळल्यास किमान ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. ही प्रक्रिया न्यायालयीन बाब म्हणून हाताळली जाते. न्यायाधीश दंडाची रक्कम आकारतात. १५ जुलैपर्यत राखीव डब्यांची तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. आतापर्यत महिला डब्यांमध्ये ३२ प्रकरणे, अपंग डब्यात प्रवास करणारे २९ प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
सीसीटीव्हीचा प्रस्ताव कागदोपत्रीच
बहुतांश रेल्वे गाड्यात महिलांसाठी राखीव डबे आहेत. या राखीव महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय यापूर्वीच रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. मात्र दोन वर्षांच्या कालावधी होऊनही महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही. त्यामुळे महिला डब्यात पुरुषांसह अन्य प्रवाशांनी प्रवास केल्यास कोणतीही कारवाई करता येत नाही. एकाद्यावेळी महिला डब्यात अप्रिय घटना घडल्यास ती उघडकीस आणणे पोलिसांसमोर आव्हान ठरेल.
रेल्वे मंत्रालयाकडून राखीव डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता जोपासण्याचे निर्देश प्राप्त झाले आहे. राखीव डब्यांची तपासणी निरंतरपणे सुरुच आहे. महिला व अपंगासाठी राखीव डब्यांमध्ये अन्य प्रवाशांनी प्रवास करु नये, यासाठी लक्ष आहे.
- सी.एच. पटेल
निरिक्षक, रेल्वे सुरक्षा दल बडनेरा