- तर आपले येणे अनमोल ठरेल...

By Admin | Updated: November 4, 2014 22:31 IST2014-11-04T22:31:32+5:302014-11-04T22:31:32+5:30

राज्याचे पालक अर्थात राज्यपाल सी. विद्यासागर राव आज अमरावती जिल्ह्यात येत आहेत. ज्या अंबानगरीबाबत 'वैभवसंपन्न प्रांत' असा उल्लेख महाभारतकाळातील ग्रंथांतही आढळतो, ती विदर्भाची सांस्कृतिक

- If you come to be priceless ... | - तर आपले येणे अनमोल ठरेल...

- तर आपले येणे अनमोल ठरेल...

निमित्त राज्यपालांच्या आगमनाचे
गणेश देशमुख - अमरावती
राज्याचे पालक अर्थात राज्यपाल सी. विद्यासागर राव आज अमरावती जिल्ह्यात येत आहेत. ज्या अंबानगरीबाबत 'वैभवसंपन्न प्रांत' असा उल्लेख महाभारतकाळातील ग्रंथांतही आढळतो, ती विदर्भाची सांस्कृतिक राजधानी महामहिमांच्या आगमनप्रतीक्षेने शहारली आहे.
कुटुंबाचा पसारा राज्यभर पसरलेला असताना लोकशाहीतील आमचे हे पालक आमच्या भेटीला आमच्या गावात येताहेत, ही अनुभूती आनंदाच्या उकळ्या आणणारी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित 'इंद्रधनुष्य २०१४' या दर्जेदार राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्ताने येणारे राज्यपाल विद्यापीठातून उसंत मिळाली की, लगेच धारणीत पोहोचणार आहेत. जंगलांमध्ये राहणाऱ्या, पोटापुरते कमविणाऱ्या, जणू वेगळ्या ग्रहावरील जीव भासावे अशा जीवनशैलीच्या आमच्याच समाजघटकांची ते आस्थेने चौकशी करणार आहेत. कुटुंबातील एक धीट मुलगा भराभर शिकून विदेशातील चमकदार दुनियेत रमावा आणि ओशाळणारा दुसरा गावातच राहून परंपारागत कार्यात मग्न व्हावा, तरीही दोघांमध्ये मायबापांचा सारखाच जीव असावा, अशीच काहीशी भूमिका राज्यपालांच्या नियोजित कार्यक्रमातून व्यक्त होत आहे.
वनसंपदेने नटलेले मेळघाट जगाच्या नकाशावर आले तेच मुळी कुपोषणामुळे. कुपोषण घालविण्यासाठी शासनाने पैशांचा पूर वाहवला. त्याचा निर्णायक परिणाम मात्र आजतागायत जाणवला नाही. हा निधी नेमका खर्च होतो तरी कुठे, असा प्रश्न आजही निर्माण होतोच. राज्यातल्या अनेक शहरांत केवळ छंद म्हणून पाळल्या जाणाऱ्या श्वानांच्या उपचारांसाठी अद्ययावत इस्पितळे आहेत. श्वानांची फॅशनेबल वस्त्रे विकणारी दुकाने आहेत. मानवाची प्रगती आणि भूतदयेबाबतची त्याची तरल संवेदना व्यक्त करणारे हे चित्र ज्या राज्यात अस्तित्वात आहे, त्याच महाराष्ट्रातील मेळघाट प्रांतात आजही अन्नावाचून चिमुकल्यांचे अन् उपचाराविना मातांचे जीव जातात, रोजगाराच्या शोधात शहरात येऊन गुलामासमान राबणारी ही आदिवासी मंडळी याच महाराष्ट्राची रहिवासी आहेत ना, असा प्रश्न मनाला भेदून जातो.
राज्यपाल महोदय, आपण येताहात. आपले अधिकारी ठराविक ठिकाणी आपणाला नेतील. कदाचित आपल्यासमेर आधीच 'पढविलेले' आदिवासी हजर करतील. 'बडे साहब आ रहे है' हे त्याला आधीच बजावून ठेवण्यात आलेले असेल. आता अशा 'बड्या साहेबां'च्या भेटींचा आणि त्यांच्यासमोर नेमके काय बोलावे लागते, याचा आदिवासींनाही सराव झाला आहे. प्रशासनाची ही नेहमीची पद्धती अमरावती जिल्ह््यालाही अंगवळणी पडली आहे. आमचा राग त्यांच्यावर नाहीच. आहे ती आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची तळमळ. राज्यपाल महोदय, एक विनंती आहे. 'प्रोटोकॉल'ची बंधने झुगारून करता आले तर बघा. अनपेक्षितपणे आपण आदिवासींच्या एखाद्या खेड्याला भेट द्या. आदिवासींशी थेट भेट होऊ द्या. या भेटीतून आपल्याला खरा आदिवासी कळेल. त्याच्या नेमक्या समस्या कळतील. नेमका उपाय योजण्यासाठी ही भेट नाडीपरीक्षणाचे कार्य करेल.
केवळ प्रशासनच नव्हे, आदिवासींच्या जीवावर जगणारे अनेक घटक मेळघाटात कार्यरत आहेत. सामाजिक संस्थांचा सुळसुळाट आहे. आदिवासींनी 'आहे तसेच' राहिले तरच या घटकांचे दुकान चालणार आहे. प्रशासनाकडून एक भीषण वास्तव सोयीस्करपणे लपविले जात आहे. नैसर्गिक सानिध्यात राहणाऱ्या काटक अन् निकोप आदिवासींमध्ये चिंताजनक लैंगिक आजारांचे प्रमाण अचानकपणे वाढू लागले आहे. पुरेसे सजग नसलेल्या आदिवासींच्या प्रजातीसाठी भविष्यातील महाप्रलयाचेच हे संकेत आहेत. आदिवासींना मायानगरीची स्वप्ने दाखविणारी अन् त्यांच्या स्वप्नातील शहराची सैर घडवून आणणारी मंडळी आता मेळघाटात पाय रोवू लागली आहे. या विषयाच्या तळाशी जाऊन ३१० गावांतील तीन लक्ष आदिवासींचे नैसर्गिक अस्तित्त्व अबाधित राखता आले तर महामहिम महोदय, आपले येणे ही मेळघाटला मिळालेली अनमोल भेट ठरेल!

Web Title: - If you come to be priceless ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.