लग्नाच्या शूटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:12+5:302021-07-27T04:13:12+5:30
अमरावती संदीप मानकर शहर व परिसरात प्री-वेडिंग, वेडिंग शूटसाठी ड्रोनचा वापर अलीकडे वाढताना दिसत आहे. मात्र, ड्रोन उड्डाण करताना ...

लग्नाच्या शूटिंगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!
अमरावती
संदीप मानकर
शहर व परिसरात प्री-वेडिंग, वेडिंग शूटसाठी ड्रोनचा वापर अलीकडे वाढताना दिसत आहे. मात्र, ड्रोन उड्डाण करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. ड्रोनचा वापर करावयाच्या नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त ठरते. हेदेखील लक्षात घेणे गरजेचे असल्याचे शहर पोलीस आयुक्तालयाच्या सुत्रांनी सांगितले.
उत्कृष्ट छायाचित्रणासाठी प्री-वेडिंगकरिता वेगवेगळ्या प्रकारे शूटिंगकरिता ड्रोनच्या वापरास प्राधान्य दिले जाते. ड्रोनव्दारे शूट केलेले व्हिडिओ चांगल्या दर्जाचे येत असल्याने त्याला पसंती दिली जाते. शहरातील वेगवेगळ्या नैसर्गिक ठिकाणांसह प्राचीन मंदिरांचा परिसर, मेळघाट अनेक स्पॉट, तसेच धबधबा व इतर निसर्गरम्य ठिकाणांना पसंती दर्शविली जाते. दरम्यान, ड्रोन वापरण्यापूर्वी काही नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. शहर पोलीस आयुक्तालयातून यासंदर्भात अद्याप तरी कुठलीही अधिसूचना काढण्यात आलेली नसली तरी ड्रोनचा वापर करण्याअगोदर डीजीसीए या (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) नियमानुसार जवळच्या पोलीस ठाण्याला लेखी पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे.
ड्रोन उडविण्यासाठी प्रमाणपत्र हवे
१) ड्रोन उडविण्याकरिता सर्वप्रथम डीजीसीएच्या मान्यताप्राप्त केंद्राकडून आठवडाभराचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
२) प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या संस्थेकडून प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राच्या आधारे ड्रोन उड्डाण करता येऊ शकते.
३) परवाना प्राप्त होईपर्यंत प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती प्रमाणपत्राच्या आधारे ड्रोनचा वापर सुरू ठेवू शकते.
४) विनाप्रशिक्षण, विनापरवाना ड्रोन उडविणे अवैध असून, पोलिसांकडून कारवाईदेखील केली जाऊ शकते.
ड्रोन वापरण्याचेही नियम
१) संरक्षण खात्याशी संबंधीत सर्व केंद्रांचा परिसर सुमारे तीन किलोमीटरपर्यंत प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केलेला असतो.
२) सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील धरणांच्या परिसरात ड्रोन वापरण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
३) विमानतळाच्या परिसरात तसेच हवाई धावपट्टीच्या भागातसुद्धा ड्रोन वापरावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे.
४) ड्रोनचा प्रकार व ड्रोन उड्डाण करणाऱ्या पायलटची डीजीसीएकडे नोंदणी आवश्यक आहे. ५) नॅनो ड्रोन हा केवळ ५० फूट अर्थातच १५ मीटर उंचीपेक्षा जास्त उडविता येत नाही. तसे केल्यास नियमांचा भंग ठरतो.
५) मायक्रो ड्रोन हा २०० फूट (६० मीटर) उंचावरच उडविता येतो. त्यापेक्षा जास्त उंचीवर उडविणे अवैध ठरते.
असे आहेत ड्रोनचे प्रकार
१) नॅनो ० ते २५० ग्रॅमपेक्षा कमी वजन
२) मायक्रो - २५१ ग्रॅम ते २.५ किलोपर्यंत वजन
३) स्मॉल -२५ किलोपर्यंत वजन
४) मीडियम- २५ ते १५ किलोपर्यंत वजन
५) लार्ज - १५० किलोपासून पुढे
कोट
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संरक्षण खात्याशी संबंधीत तसेच पोलीस खात्याशी संबंधीत विविध आस्थापनांचे संवेदनशील क्षेत्र अस्तित्त्वात आहे. विमानतळ किंवा धावपट्टी अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करणे टाळायला हवे. ड्रोनचा वापर करण्यापूर्वी मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेकडे त्याची नोंदणी करणे गरजेचे असून, संबंधीत ठाण्यात लेखी कल्पना देणे आवश्यक आहे. तसेच डीजीसीएकडून परवानी घेऊनच ड्रोन उड्डाण करावे. होऊ घातलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी फोटोग्राफर व ड्रोनचा वापर करणाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.
आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती.