- तर पार्किंगचा स्फोट!
By Admin | Updated: July 27, 2016 00:09 IST2016-07-27T00:09:36+5:302016-07-27T00:09:36+5:30
शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना अनियंत्रित पार्किंगचा प्रश्न हाताबाहेर गेला आहे.

- तर पार्किंगचा स्फोट!
जिल्ह्यात ५ लाख दुचाकी : उड्डाणपुलाखाली नो पार्किंग!
अमरावती : शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना अनियंत्रित पार्किंगचा प्रश्न हाताबाहेर गेला आहे. संकुलधारकांनी पार्किंग बळकावल्याने व इमारत बांधकामावेळी पार्किंग व्यवस्थेचे नियोजन न केल्याने पार्किंग समस्योचा स्फोट होण्याची शक्यचा आहे. उड्डाणपुलाखाली नो पार्किंगची फलके लागल्यानंतर पार्किंगच्या समस्येत मोठी भर पडेल. त्याअनुषंगाने पोलीस व महापालिका या उभय यंत्रणेसमोर वाहतुकीच्या सुयोग्य नियमासह पार्किंगच्या मुद्यावर तोडगा काढण्याचे आव्हान मोठे राहणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम यांनी २५ जुलै रोजी एक आदेश काढून २००७ च्या अधिसूचनेत बदल करुन दोन्ही उड्डान पुलाखालील पार्किंग रद्द केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी नेमकी केव्हापासून सुरु होईल, हे स्पष्ट नसले तरी उच्च न्यायालय आणि त्या अनुषंगाने गृह विभागाच्या निर्देशांची अंमलबजावणी पोलिस यंत्रणेला करणे बंधनकारकच आहे. त्यामुळे उड्डानपुलाखालील पार्किंग हटविल्यास पार्किंगच्या समस्येत मोठी भर पडणार असल्याची भिती व्यक्त होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्वदूरच्या बहुतांश संकुल, व्यावसायिक संकुलांकडे पार्किंगची व्यवस्था नाही. मार्केटमधील दुकानांना पार्किंग नसल्याने ग्राहकांसह दुकानदार व कर्मचाऱ्यांची वाहने रस्त्यावर उभी केली जातात.अनेक हॉटेल आणि मंगल कार्यालर्यालयांनी पार्किंगच्या जागेवर अन्य काही थाटल्याचे निरीक्षण महापालिकेने नोंदविले आहे.
दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न आ वासून उभा ठाकला असतांना उड्डानपुलाखालील जागेने पालिकेतील वाहन धारकांना दिलासा मिळाला होता. या दोन्ही उड्डानपुलाखाली अडीच ते तीन हजारांच्या जवळपास वाहनांची पार्किंग रोज केली जाते. त्यात चारचाकी वाहकांचा समावेश आहे. नव्या आदेशानुसार उड्डानपुलाखाली पार्किंग रद्दची अंमलबजावणी झाल्यास या हजारों वाहनांच्या अतिरिक्त पार्किंगचा प्रश्न उभा ठाकणार आहे.
बहुतांश दुकानदारांच्या दुचाकी, चारचाकी उड्डानपुलाखाली पार्क केल्या जातात. आता ही वाहने दुकानासमोर लागतील व ती अवैध पार्किंग अनियंत्रित वाहतुकीला कारणीभूत ठरेल. जिल्ह्यात ४ लाख ९८ हजार दुचाकी आहेत. त्यातील ४० टक्के वाहने शहरात असल्याचे सर्व्हेक्षण आहे. शहरात कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. पार्किंगची जागा ‘जैसे थे’ असतांना वाहनांच्या संख्येत बेसुमार वाढ झाल्याने पार्किंगची समस्या डोकेदुखी ठरली आहे. (प्रतिनिधी)
डीसीपींचा आदेश
५ आॅक्टोंबर २००७ नुसार शहरातील दोन्ही उड्डानपुलाखाली पार्किंगकरिता जागा देण्यात आली. मात्र ८ जुलै रोजी उच्च न्यायालयाने उड्डाणपुलाखालील पार्किंग व इतर अनधिकृत साहित्य हटविण्याबाबत सूचित केले आहे. त्या सूचनेनुसार पोलीस आयुक्तालय अमरावतीतर्फे पार्किंग करण्याबाबत निर्गमित केलेल्या अधिसूचनेमधील उड्डानपुलाखाली वाहन पार्किंगचे ठिकाण रद्द करण्यात येत आहे, असा आदेश डीसीपींनी काढला.
सर्व उड्डाणपुलांखालील पार्किंग हटविण्याचे गृहविभागाचे निर्देश आहेत. पोलीस महासंचालकांकडून सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलिस आयुक्तांना त्यासंबंधीच्या सूचनापत्र मिळाले आहेत. महापालिकेशी समन्वय साधून निर्देशांची अंमलबजावणी करू.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त