गृहराज्यमंत्र्यांनी सुनावले, तर मीच पोहोचेन तेथे !
By Admin | Updated: October 27, 2016 00:14 IST2016-10-27T00:14:11+5:302016-10-27T00:14:11+5:30
रात्रीचे ८.३० वाजलेले. गृह खात्याचे राज्यमंत्री रणजित पाटील हे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना फोन करतात-

गृहराज्यमंत्र्यांनी सुनावले, तर मीच पोहोचेन तेथे !
केशव कॉलनीतील गुंडगिरी : सीपी घामाघूम, दीडशे पोलिसांची रात्रभर गस्त
अमरावती : रात्रीचे ८.३० वाजलेले. गृह खात्याचे राज्यमंत्री रणजित पाटील हे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना फोन करतात- ''केशव कॉलनी परीसरात वाईनशॉपसमोर काही गावगुंड मुले दारू पीत बसलेली आहेत. रोजच तेथे हा प्रकार सुरू असतोे. याद राखा, मी हे मुळीच खपवून घेणार नाही. तुम्ही स्वत: आताच तेथे पोहचा. तुम्ही पोहोचले नाही तर मी तेथे पोहोचेन आणि मी पोहोचलो तर कठीण जाईल..''
अमरावती शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या केशव कॉलनी परीसरात रोज रात्री भररस्त्यावर दारू पिणाऱ्या गावगुंडांबाबत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना त्यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान माहिती मिळाली नि ते कमालिचे अस्वस्थ झालेत. सामान्यांचे जीणे कठीण करणाऱ्या या मुद्याची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली. सीपींना स्पॉट व्हिजिट करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच सीपी दत्तात्रय मंडलिक यांच्यासह तब्बल दीडशे पोलिसांच्या ताफ्याने सोमवारच्या रात्री केशव कॉलनीतील 'त्या' स्पॉटसह अख्खे अमरावती शहरच पिंजून काढले. रणजित पाटील यांनी संवेदनशीलपणे घेतलेली दखल शहरातील सामान्य नागरिकांना सुखाची झोप देणारी ठरली.
काय आहे प्रकरण?
केशव कॉलनी परीसरात गणोरकर बिल्डिंगच्या आणि शाश्वत कॉन्सेप्ट स्कूलच्या बाजुला भामोरे यांचे वाईन शॉप आहे. वाईन शॉपच्या आडून गावगुंडांना पोसण्याचे काम केले जाते. त्यामुळेच दारूच्या बाटल्यांसोबत डिस्पोजेबल ग्लासेस आणि थंडगार पाण्याच्या बाटल्या मुद्दामच वाईनशॉपमधून विकल्या जातात. या वाईन शॉप परीसरात शहरातील विविध वस्त्यांतील गुंड मुले एकत्र जमतात. दिवसभर गैरकायद्याच्या मंडळींचा तेथे राबता असतो. सायंकाळी वाईन शॉप समोरच्या रस्त्यावर बसून हे गावगुंड खुल्या आकाशाखाली चक्क बार भरवतात. शेजारीच असलेल्या पानठेल्यावरून सिगार आणि इतर तंबाखुजन्य पदार्थ त्यांना उपलब्ध होतात. मुख्य रस्त्याच्या पलिकडे रात्री लावण्यात येणाऱ्या अंडी विक्रीच्या लोटगाडीवरून दारूसोबत तोंडी लावण्यासाठी उकळलेली अंडी, लिंबू व इतर चटपटीत पदार्थ उपलब्ध होतात. रोजच भरणाऱ्या खुल्या बारमुळे हा सारा पुरक व्यवसाय त्या परीसरात फोफावला आहे.
लोकांची ये-जा बंद
अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या खुल्या बारविरुद्ध केशव कॉलनी परीसरातील जे-जे लोक बोलले त्यातील प्रत्येकालाच गुंडगिरीचा त्रास सहन करावा लागला. गुंडांनी काहींना घरात शिरून मारहाण केली. घरासमोर उभी असलेली त्यांची वाहने अनेकदा फोडली. गुंड आणि नागरीक यांच्यातील सततच्या संघर्षात अखेर गुंड जिंकले. केशव कॉलनी परीसरातील नागरिकांनी गणोरकर बिल्डिंगलगतचा रस्ता सायंकाळनंतर वापरणेच बंद केले आहे. अंधार पडल्यानंतर पहाटेपर्यंत हा रस्ता जणू गुंडांची जागीरच असतो.
ज्या इमारतीत वाईनशॉप आहे त्या व्यावसायिक संकुलात इतरही दुकाने आहेत. दुकानांच्या पाऱ्यांवर हे गुंड बसून टवाळक्या करीत असतात. बेकरी, दुध, किराणा आणि दैनंदिन व्यवहारासाठी लागणारे सामान खरेदी करण्यासाठी आता केशव कॉलनी परीसरातील लोक त्यांच्या घरातील महिला, मुलींना त्या व्यावसायिक संकुलात पाठवित नाहीत, इतकी स्थिती दहशतीची झाली आहे.
दुकानाचे साहित्य फोडले
दुकानदाराने हटकले म्हणून गुंडांनी दुकानाबाहेर ठेवण्यात आलेल्या मूर्ती आणि इतर सामानाची रात्रीतून तोडफोड केली होती. आमच्याविरुद्ध बोलाल तर याद राखा- असा संदेशच गुंडांनी दिला होता. दुकानदारही त्यामुळे गप्प आहेत.
कौतुक, अभिनंदन!
गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी ज्या संवेदनशीलपणे गुंडगिरीचा बिमोड करण्याचे आदेश दिलेत, त्यासाठी केशव कॉलनी परीसरातील नागरिकांनी छोटेखानी बैठक घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.