- तर तो बिबट करू शकतो हल्ला!
By Admin | Updated: April 1, 2015 00:22 IST2015-04-01T00:22:20+5:302015-04-01T00:22:20+5:30
बिबटाच्या अस्तित्वाने घाबरलेल्या एसआरपीएफ कॅम्प परिसरातील नागरिकांनी सातत्याने आरडाओरड करुन, गोंधळ घालून सुरू केलेला बिबटाचा पाठलाग घातक ठरू शकतो.

- तर तो बिबट करू शकतो हल्ला!
वैभव बाबरेकर अमरावती
बिबटाच्या अस्तित्वाने घाबरलेल्या एसआरपीएफ कॅम्प परिसरातील नागरिकांनी सातत्याने आरडाओरड करुन, गोंधळ घालून सुरू केलेला बिबटाचा पाठलाग घातक ठरू शकतो. आतापर्यंत मनुष्यांवर हल्ला न करणारा हा बिबट मनुष्यांचीही शिकार करू शकतो, अशी भिती निर्माण झाली आहे.
वनखात्याला असलेली ही भिती त्यांनी अधिकृतपणे व्यक्त केली नसली तरी असे काही घडू नये यासाठी वनखाते चिंतीत आहे. स्वत:ची सक्रीयता वाढवून सामान्य नागरिकांचा हस्तक्षेप कमी करण्याचा हरेक मार्ग अवलंबण्याचा प्रयत्नही ते करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी श्वान आणि वराहांची शिकार करणारा बिबट आता वारंवार त्यांची शिकार करतोय. या माणसाळलेल्या प्राण्यांची शिकार अत्यंत सोपी असल्यामुळे बिबटाला ती आकर्षित करते. बिबटाने चुकून मनुष्यप्राण्याची शिकार केली तर मनुष्याची सोपी शिकारही त्याला भविष्यात आकर्षित करू शकेल, अशी चिंता वन्यजिव अभ्यासकांना आहे.
५०० क्वॉर्टर्स परिसरातील नाल्याजवळ बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे नागरिक धास्तावले आहेत. वनविभागाने परिसरात सात सीसीटीव्ही कॅमेरे व उंच टेकडीवर प्रोटेक्शन कॅम्प लावून बिबट्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवूनच आहेत. मात्र, वनविभागाची नजर चुकवित बिबट्यांने तीन ते चार दिवसांत दोन वराह व दोन श्वानांची पुन्हा शिकार केली. सायंकाळच्या सुमारास बिबट शिकारीच्या शोधात परिसरात दाखल होतो. बिबटाविषयी नागरिकांमध्ये धास्ती व उत्सुकताही निर्माण झाली आहे. बिबट आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरते. अनेक जण णकत्र येतात. झुंडीने शोधमोहिम राबवतात. आरडाओरड करतात. अशावेळी बिबटाने शिकार घेवून पलायन केल्याचे स्पष्ट झाले आहे. या कृतीमुळे हिंस्त्र पशु बिबट आक्रमक होऊन रहिवाशांवरही हल्ला करू शकतो, यापासून बहुतांश रहिवासी अनभिज्ञ आहेत. बिबटाने नरभक्षण केल्याचे उदाहरण शहरात नाही. त्यामुळे संयम राखून वनखात्याला मदत केल्यास नागरिक आणि बिबट दोघेही सुरक्षित राहतील.