संत ऋषी महाराज यांची मूर्ती अज्ञाताने पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:13 IST2021-03-15T04:13:25+5:302021-03-15T04:13:25+5:30
फोटो पी १४ तिवसा तिवसा : येथील आनंदवाडी परिसरातील टेकडीवरील संत ऋषी महाराज यांच्या मंदिरातील मूर्तीच अज्ञातांनी तोडून पळवून ...

संत ऋषी महाराज यांची मूर्ती अज्ञाताने पळवली
फोटो पी १४ तिवसा
तिवसा : येथील आनंदवाडी परिसरातील टेकडीवरील संत ऋषी महाराज यांच्या मंदिरातील मूर्तीच अज्ञातांनी तोडून पळवून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
श्री संत ऋषी महाराज पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येत असतात. दुपारी ऋषी महाराज यांची मूर्तीच अज्ञात व्यक्तीने सबलीने काढून चोरून नेली. ही वार्ता गावात पसरताच अनेकांनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला. अतुल देशमुख यांनी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंविचे कलम ३८० अन्वये अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.
बॉक्स
पालकमंत्री यशोमती ठाकूर व नगरपंचायतच्या निधीतून गावाबाहेर असलेल्या या ग्रामदेवतेच्या टेकडीवरील मंदिर परिसरात विकासकामे सुरू आहेत. वनविभागाने त्यांच्या अखत्यारीतील काही जागा पर्यटन आणि ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र असल्याने विकासकामांसाठी दिली आहे.
दरम्यान, कुण्या समाजकंटकाने हे कृत्य केले, याची चौकशी करण्याची मागणी तिवसा शहरातील सर्व नागरिक आणि भाविक भक्त करीत आहेत. तिवसा शहरातील समर्थ सोटागीर महाराज, संत ऋषी महाराज, संत शेख फरीदबाबा आणि संत रतनगिरी महाराज ही प्रमुख ग्रामदैवते आहेत. शहराच्या चार कोपऱ्यांवर चार दिशेने या संतांची प्राचीन मंदिरे आहेत. हजारो भाविकांच्या भावना या मंदिराशी जुळल्या आहेत.
कोट
सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- रीता उईके, ठाणेदार, तिवसा