नऊ तालुक्यांत हायड्रोपॉनिक चारनिर्मिती प्रकल्प
By Admin | Updated: October 15, 2015 00:17 IST2015-10-15T00:17:32+5:302015-10-15T00:17:32+5:30
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कमी खर्चाच्या हायड्रोपॉनिक तंत्रज्ञानाव्दारे ^(माती विना) हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेण्यात येणार आहे.

नऊ तालुक्यांत हायड्रोपॉनिक चारनिर्मिती प्रकल्प
प्रस्ताव तयार : गतिमान वैरणविकास कार्यक्रम
लोकमत विशेष
अमरावती : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कमी खर्चाच्या हायड्रोपॉनिक तंत्रज्ञानाव्दारे ^(माती विना) हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प विभागातील ४३ तालुक्यांमध्ये राबविला जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश आहे. अवर्षणप्रवण क्षेत्रातील विभागातील एकूण पाच जिल्ह्यातील तालुक्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
गतिमान वैरणविकास कार्यक्रमांतर्गत चारा उत्पादनासाठी लाखो रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. हाड्रोपॉनिक्स तंत्रज्ञानाव्दारे हिरवा चारा निर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. अवर्षणप्रवण क्षेत्र या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या गोवा शाखेने हायड्रोपॉनिक्स चारा पध्दती विकसित केली असून ही पध्दती कमी खर्चाची आहे. त्यात पाण्याची गरजही कमी असते, कमीत कमी जागेत व कमी दिवसात हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेता येते. मातीशिवाय उगवणाऱ्या या हिरव्या चाऱ्यात पशुधनवाढीसाठी तसेच दुधाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक घटक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हिरव्या चाऱ्याची काढणी अत्यंत सोपी आहे. वेळेची बचत व वातावरणातील किडरोगांचा यावर प्रादूर्भाव न होणे ही या चाऱ्याची जमेची बाजू ठरली आहे. अद्याप राज्यात महसूल विभागाने दुष्काळसदृश स्थिती असलेल्या जिल्ह्यांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे ही योजना राबविण्यासाठी अवर्षणग्रस्त तालुक्यांनाच उद्दिष्ट देण्यात आले आहे.
कमी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी चाराटंचाई आहे. यावर उपाय म्हणून चारा डेपो उघडले जातात. मात्र, यात मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होतो आणि कायमस्वरुपी तोडगाही निघत नाही. अशा स्थितीत चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे. गतिमान वैरणविकास कार्यक्रमांतर्गत ही योजना राबविली जाणार आहे, यासाठी १० कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात एका युनिटच्या उभारणीसाठी २४ हजार रुपये खर्च येणार आहे. किंमतीच्या २५ टक्के म्हणजेच सहा हजार रुपये प्रतियुनिट अर्थसहाय्य यासाठी देण्यात येणार आहे. हा प्रकल्प वरदायी ठरण्याची चिन्हे आहेत.
जनावरांना कमी दिवसात आणि कमी पाण्यात हिरवा चारा या प्रकल्पाचे माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही ऋतूमध्ये हिरवा चारा उपलब्ध राहण्याचे दृष्टीने हा उपक्रम दिलासादायक आहे.
-पुरूषोत्तम सोळंके,
जिल्हा पशुसंवर्धन, अधिकारी जि.प.
या तालुक्यांची निवड
जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी ९ तालुके हायड्रोपॉनिक प्रकल्पासाठी निवडण्यात आले आहेत. यामध्ये नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अचलपूर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, तिवसा, दर्यापूर, मोर्शी, धारणी या तालुक्यांमध्ये हा प्रकल्प साकारला जाईल.