संत्रा झाडांसह झोपडीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST2021-03-01T04:15:46+5:302021-03-01T04:15:46+5:30
घातपाताची शक्यता : हिवरखेड येथील घटना मोर्शी : तालुक्यातील हिवरखेड येथील एका महिलेच्या शेताला आग लागून त्यात संत्राझाडांसह झोपडी ...

संत्रा झाडांसह झोपडीला आग
घातपाताची शक्यता : हिवरखेड येथील घटना
मोर्शी : तालुक्यातील हिवरखेड येथील एका महिलेच्या शेताला आग लागून त्यात संत्राझाडांसह झोपडी जळून खाक झाली. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. यात सुमारे १० लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वेणू प्रभाकर भुजाडे यांच्या शेताला ही आग लागली. या घटनेमागे घातपाताची शक्यता देखील वर्तविली जात आहे. पतीने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर त्या घर व शेती सांभाळत होते. त्यांचे पती प्रभाकरराव भुजाडे यांच्याकडे बोपलवाडी शिवारात दोन एकर शेती आहे. त्यांनी दीड वर्षापूर्वी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. पत्नी वेणू व मुलगा शेती करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. २७ फेब्रुवारी रोजी वेणूबाई प्रभाकरराव भुजाडे घरी असताना दुपारी ४ वाजताच्या दरम्यान त्यांच्या बोपलवाडी शिवारात असलेल्या शेतात अचानक आग लागून शेतात असलेली २९ संत्र्यांची झाडे जळून खाक झाली. तद्वतच झोपडीसुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत जवळपास १२ रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच हिवरखेडचे सरपंच विजय पाचारे यांनी शेतात धाव घेऊन त्याबद्दलची माहिती तात्काळ मोर्शीचे तहसीलदार यांना दूरध्वनीवरून दिली. २८ फेब्रुवारी रोजी पंचनामा करण्यात आला.