पतीच्या अनैतिक संबंधाने आठवडाभरात तोडला संसार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 21:28 IST2021-09-23T21:27:22+5:302021-09-23T21:28:31+5:30
Amravati News पतीच्या लग्नापूर्वीच्या अनैतिक संबंधाने एक संसार आठवडाभरात मोडकळीस आला. येथील विलासनगर भागात घडलेल्या या घटनेबाबत गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.

पतीच्या अनैतिक संबंधाने आठवडाभरात तोडला संसार !
अमरावती: पतीच्या लग्नापूर्वीच्या अनैतिक संबंधाने एक संसार आठवडाभरात मोडकळीस आला. येथील विलासनगर भागात घडलेल्या या घटनेबाबत गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी समुपदेशानाचा पर्यायही चोखाळला. मात्र, समेट घडून न आल्याने महिलेच्या पती, भासरा व एका महिलेविरुद्ध भादंविचे कलम ४९८ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
विलासनगर येथील एका तरुणीचे जयेश नामक तरुणाशी १४ जून २०२० रोजी लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या सात-आठ दिवसांनी पतीने तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. आई-वडिलांकडून एक लाख रुपये आण, असे म्हणून तिला घराबाहेर हाकलून दिले. मात्र, नेमके कारण वेगळेच निघाले.
पतीचे पूर्वीपासून एका मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पीडिताला कळले, नव्हे तर त्या मुलीने पिडिताच्या मोबाईलवर मॅसेज टाकून तसे कळविले. हा सर्व प्रकार पतीच्या आईवडिलांसह भासऱ्यालादेखील माहीत असताना त्यांनी लग्नानंतर लगेचच पैशाची मागणी करून विवाहितेचा अनन्वित छळ केला. याबाबत पीडिताने २ सप्टेंबर रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. ती तक्रार समुपदेशनासाठी महिला सेलला पाठविण्यात आली. त्या अर्जाच्या चौकशीदरम्यान पती, भासरा, सासू यांनी आपसी समझोता करून लग्नात केलेला १.५० लाख रुपये परत करण्यास होकार भरला. मात्र, त्यानंतर पैसे देत नाही, तुला वागवत नाही, त्या मुलीसोबत मी लग्न केले, तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, अशी गर्भित धमकी पती जयेशने पीडिताला दिली. तसा अहवाल महिला समुपदेशन कक्षाने गाडगेनगर पोलीस ठाण्याला दिला. त्यावरून गाडगेनगर पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी दुपारी पती, भासरा व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
संबंधित महिलेची तक्रार व महिला तक्रार निवारण कक्षाच्या अहवालाच्या आधारे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीला वेग देण्यात आला आहे.
- सूरज कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक, गाडगेनगर