पती-पत्नी आणि फेसबुक
By Admin | Updated: May 16, 2015 00:43 IST2015-05-16T00:43:53+5:302015-05-16T00:43:53+5:30
इंग्लंडच्या एका कायदेशीर सल्लागार कंपनीने नुकताच एक खुलासा केला आहे.

पती-पत्नी आणि फेसबुक
अमरावती : इंग्लंडच्या एका कायदेशीर सल्लागार कंपनीने नुकताच एक खुलासा केला आहे. यात आपल्या जोडीदाराचा सोशल नेटवर्किंग साईटवर अधिक काळ घालवण्यावरून घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सचा परिणाम आता खासगी आयुष्यावर पण होऊ लागला आहे. त्यामुळे नातेसंबंध दुभंगायला लागले आहेत. ब्रिटनमध्ये प्रत्येक सात जणांपैकी एका व्यक्तीच्या घटस्फोटाचे कारण सोशल नेटवर्किंग साईट ठरते आहे.
विवाहसंबंधांसाठी नवे संकट
स्लेटर अँड गॉर्डनच्या कौटुंबिक कायद्याचे अध्यक्ष एंड्र न्यूबरीने आॅनलाईन वक्तव्य जारी केले आहे. त्यात ते म्हणाले, 'पाच वर्षांपूर्वी घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये फेसबुकचा संदर्भ होत नव्हता; पण आता लोक सोशल मीडियावर असलेल्या कोणत्याही कमेंटच्या आधारे लग्न तोडण्याचे मुख्य कारण म्हणून सांगतात.' न्यूबरी पुढे म्हणाले, 'आम्हाला अभ्यासात असे आढळले की, सोशल मीडिया विवाहसंबंधासाठी नवे संकट बनले आहे. अर्धेअधिक लोक आपल्या जोडीदाराच्या फेसबुकवरील वापरावर लपवून नजर ठेवतात आणि ते चेक करतात. प्रत्येक पाचमधील एक व्यक्ती फेसबुकशी निगडित कोणत्याही बाबीवरून आपल्या जोडीदारासोबत भांडणाच्या स्थितीत आहे.'