बायकोच्या मोबाईलला वैतागले नवरे, भरवसा सेलमध्ये ६२४ तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST2021-01-08T04:38:19+5:302021-01-08T04:38:19+5:30
नवरा-बायकोच्या भांडणाच्या भरवसा सेलमध्ये ६२४ तक्रारी, १६२ प्रकरणात घडविला समेट अमरावती: संदीप मानकर बायकोच्या मोबाईलला वैतागलेले नवरे, घरगुती वाद, ...

बायकोच्या मोबाईलला वैतागले नवरे, भरवसा सेलमध्ये ६२४ तक्रारी
नवरा-बायकोच्या भांडणाच्या भरवसा सेलमध्ये ६२४ तक्रारी, १६२ प्रकरणात घडविला समेट
अमरावती: संदीप मानकर
बायकोच्या मोबाईलला वैतागलेले नवरे, घरगुती वाद, नवरा-बायकोचा एकामेकांवरील संशय, नवऱ्याला जडलेले दारूचे व्यसन तसेच फेसबूक, व्हॉट्सॲपच्या वापरामुळे होणारी भांडणे, विवाहित महिलेचा सासरच्या मंडळीकडून होणारा छळ आदी कारणांमुळे वर्षभरात पोलीस आयुक्तलयात असलेल्या भरवसा सेलमध्ये ६२४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बायकोच्या मोबाईलला वैतागल्यानंतर नवऱ्यानेसुद्धा पोलिसांकडे बायकोची तक्रार केल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत.
भरवसा सेलमध्ये तक्रारीचा अर्ज आल्यानंतर येथील महिला पोलीस व अधिकारी नवरा व बायकोचे समुपदेशन करून दोघांचीही समजूत काढतात. त्यांचा संसार कसा टिकेल, त्यांच्यातील गैरसमज दूर होऊन समेट कसा घडेल, याकरिता प्रयत्न केले जातात. समझोता न झाल्यामुळे २६४ प्रकरणे पुढील कारवाईसाठी शाखेला फाई्ल केल्याचे पोलिसांनी सांगितले. १६२ प्रकरणांत समेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले. २९ प्रकरणांत कुठलाच तोडगा न निघाल्यामुळे भादंविचे कलम ४९८ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्याकरिता ही प्रकरणे संबंधित ठाण्यात पाठविण्यात आल्याची माहिती शहर भरवसा सेलचे पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बॉक्स:
नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची कारणे
नवऱ्याचा किंवा बायकोचा दुसऱ्यावर संशय, सासू-सासऱ्याशी न पटणे, फोनवर बोलणे, सोशल मीडियाचा वाढता वापर, नवऱ्याचे व्यसन, नवरा कमावित नसल्याचे कारण, टोमणे मारणे, एकामेकांवरील अविश्वास आदी कारणांमुळे दाम्पत्यमध्ये वाद होऊन ही प्रकरणे पोलिसांसमोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.
बॉक्स :
१६२ प्रकरणांत समेट
जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान शहरातील भरोसा सेलकडे नवरा-बायकोच्या भांडणाच्या ६२४ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी १६२ प्रकरणांत समेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले.२०१९ मध्ये ६६६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १८२ प्रकरणांत समेट घडवून आणला. ही कुुटुंबे आता गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
भरवसा सेलमध्ये आलेल्या तक्रारी
२०१९ - ६६६
२०२० - ६२४
कोट
भरवसा सेलच्या माध्यमातून पती-पत्नीचे समुपदेशन करून त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. पत्नीच्या तक्रारीवरून पती किंवा सासरच्या मंडळीविरुद्ध एफआयआर झाला, तर ते संबध आणखीन ताणले जातात. पण, त्याआधी समेट घडला, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतात.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती