शेकडो महिलांची वीज कार्यालयावर धडक
By Admin | Updated: July 2, 2016 00:15 IST2016-07-02T00:15:41+5:302016-07-02T00:15:41+5:30
नजीकच्या आमला विश्वेश्र्वर येथे मागील दहा दिवसांपासून रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सुरू आहे.

शेकडो महिलांची वीज कार्यालयावर धडक
आमला विश्वेश्वर येथे अघोषित लोडशेडिंग : वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी
चांदूररेल्वे : नजीकच्या आमला विश्वेश्र्वर येथे मागील दहा दिवसांपासून रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे हैराण झालेल्या येथील शेकडो महिलांनी शुक्रवारी स्थानिक वीज कार्यालयावर धडक देऊन अघोषित लोडशेडिंग बंद करण्याची मागणी केली. या महिलांनी उपकार्यकारी अभियंता बिजवे यांना लेखी निवेदन दिले. बिजवे यांनी वीज पुरवठा वारंवार खंडित होऊ नये, यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
महिलांच्या या मोर्चाचे नेतृत्त्व सरपंच रजनी मालखेडे यांनी केले. यावेळी अपेक्षा होमिओ सोसायटीच्या मनू वरठी, सोमेश्वर चांदूरकर आदींची उपस्थिती होती. आमला विश्वेश्वर परिसरात अघोषित लोडशेडिंग सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दररोज रात्री वीज गुल होते. परिणामी शेतीच्या कामावरून थकून घरी आलेल्या ग्रामस्थांच्या झोपेचे खोबरे होते. आजारी, वृद्ध आणि लहान मुलेदेखील या अघोषित भारनियमनामुळे हैराण झाले आहेत. अखेर संतप्त होऊन महिलांनी वीज कार्यालयावर धडक देऊन निषेध नोंदविला व सुरळीत विद्युत पुरवठ्याची मागणी केली.
महिलांचा रोष पाहून उपकार्यकारी अभियंता बिजवे यांनी महिलांना यापुढे सुरळीत विद्युत पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ही स्थिती उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. आमला विश्वेश्वर हे गाव पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे. हे गाव चांदूररेल्वे ग्रामीण विद्युत कार्यालयाला जोडण्यात आले आहे. या गावाकरिता विद्युत मंडळाने तांत्रिक सेवकाची नियुक्ती देखील केली आहे. परंतु तो कायमस्वरूपी नसल्याने विजेमधील बिघाड तातडीने दुरूस्त होत नाही. त्यामुळे येथे कायमस्वरूपी तांत्रिक सेवकाची नियुक्ती करण्याची मागणी आहे. निवेदन देताना कल्पना केने, ज्योती कावलकर, सुचिता चर्जन, माधुरी डोंबारे, रजनी होडे, रजनी कावलकर, संगीता हंबर्डे, सविता श्रीखंडे, ज्योत्सना उगले, सविता मोहोड, सुनीता शिरपूरकर, विद्या बोबडे, कमला कळमकर, पूजा दुबे, प्रिया मेश्राम, साधना शेळके, आशा दुबे, सुशीला बकाले, शारदा बकाले, वैजयंती चर्जन, माधुरी बकाले, संगीता खेरडे, अमिता वैद्य, नलिनी तिवाडे, शोभा नंदरघने, भावना नंदरधने, वंदना कर्डुकार यांचेसह शेकडो महिला उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)