हजारो अनुयायांची साश्रूनयनांनी श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:01 IST2017-09-12T23:01:27+5:302017-09-12T23:01:27+5:30
विदर्भातील संतपरंपरेत आपले आगळे स्थान निर्माण करणारे संत अच्युत महाराज यांचा पाचवा पुण्यतिथी महोत्सव मंगळवारी तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे आयोजित करण्यात आला.

हजारो अनुयायांची साश्रूनयनांनी श्रद्धांजली
रोशन कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : विदर्भातील संतपरंपरेत आपले आगळे स्थान निर्माण करणारे संत अच्युत महाराज यांचा पाचवा पुण्यतिथी महोत्सव मंगळवारी तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे आयोजित करण्यात आला. यावेळी अच्युत महाराजांच्या हजारो अनुयायांनी साश्रुनयनांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली.
संत अच्युत महाराजांच्या पाचव्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी शेंदूरजना बाजार येथे सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली. शकडो किमी अंतरावरून आलेल्या महाराजांच्या अनुयायांनी गर्दीने संपूर्ण परिसर फुलला होता. सकाळी दहा वाजता पुण्यतिथी कार्यक्रमाला सुरूवात झाली. महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत हरिनाम जप सहित संगीतमय गीते अर्पण करून सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समाधी स्थळाव्यतिरिक्त गावात ठीकठिकाणी भाविकांनी अच्युत महाराजांचा फोटो ठेवून पूजन केले. सर्व गाव स्वच्छ करून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी संत भानुदास महाराज, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्धनपंत बोथे, सुधीर दिवे, अनिल सावरकर, पासेबंद साहेब, सचिनदेव महाराज, अनंत धर्माळे, किशोर सावरकर, शाम गडकरी, रायजीप्रभू शेलोटकर, भगीरथ मालधुरे, लता देवते, सरपंच सागर बोडखे, युवराज भोजने, मनोहर निमकर, वामनराव भोजने, विजय देवळे, विवेक सावरकर यांच्यासह त्यांचे निकटवर्ती अनुयायी उपस्थित होते.
महाराजांचे विचार कालातीत
संपूर्ण विदर्भात पसरलेले संत अच्युत महाराजांचे अनुयायी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त एकत्र आले होते. महाराजांचे अनुयायी त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार आजही करीत आहेत. यामुळे त्यांच्या अनुयायांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराजांचे विचार कालातीत आहेत, असे महाराजांच्या अनुयायांनी सांगितले.