पीक विम्यापासून शेकडो शेतकरी वंचित
By Admin | Updated: June 23, 2016 00:06 IST2016-06-23T00:06:01+5:302016-06-23T00:06:01+5:30
नांदगाव तालुक्यात सन २०१४-१५ मध्ये शेकडो शेतकऱ्यांनी पीकविमा काढला व ही रक्कम बँकेत जमासुध्दा झाली.

पीक विम्यापासून शेकडो शेतकरी वंचित
पुनर्गठनालाही नकार : सेंट्रल बँकेची मनमानी
नांदगाव खंडेश्वर : नांदगाव तालुक्यात सन २०१४-१५ मध्ये शेकडो शेतकऱ्यांनी पीकविमा काढला व ही रक्कम बँकेत जमासुध्दा झाली. परंतु अद्याप शेतकऱ्यांना पिकविमा रकमेचे वाटपच झाले नाही. सेंट्रल बँक व्यवस्थापक कर्ज पुनर्गठनाससुध्दा नकार देत असल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, यासाठी युवासेनेने दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
खरीप हंगामात पेरणी सुरु झाली असताना सन २०१४-१५चीविमा रक्कम सेंट्रल बँकेच्या हेकेखोरपणामुळे शेतकऱ्यांना अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे शेतात पेरणी कशी करायची, या विवंचनेने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्ज पुनर्गठनासाठी शेतकरी बँकेच्या चकरा मारीत आहेत. बँक व्यवस्थापन शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परतवून लावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. याबाबत युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी बँक व्यवस्थापकाला निवेदन देऊन शेतकऱ्यांची आपबीती कथन केली.
दोन दिवसात जर शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, गजानन खोडे, शिवाजी मेश्राम, मनोज बनारसे, भोला वैरागडे, महादेव चव्हाण, सुरज लोमटे, अभय बनारसे, मयुर काकडे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांकडे युवासेनेची तक्रार
हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सहकार्य करावे, यासाठी युवासेनेचे प्रकाश मारोटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सेंट्रल बँक व्यवस्थापकाविरोधात तक्रार दाखल केली व सन २०१४-१५ ची पीकविमा रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ देऊन निदान पेरणीसाठी तरी ही रक्कम कामी यावी, अशी विनंती केली.