कुबडे पसार, पोलीस मागावर

By Admin | Updated: January 15, 2017 00:03 IST2017-01-15T00:03:04+5:302017-01-15T00:03:04+5:30

संशयास्पद कार्यप्रणालीने जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक शेतकरी कर्जदारांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवणारे कुबडे ज्वेलर्सचे प्रमुख असलेले सावकार महादेव कुबडे हे पसार झाले आहेत.

Humpbacks, police leads | कुबडे पसार, पोलीस मागावर

कुबडे पसार, पोलीस मागावर

तपासकार्यात सहकार्य नाही : आणखी तीन सावकारांविरुद्ध फौजदारी गुन्हे
अमरावती : संशयास्पद कार्यप्रणालीने जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक शेतकरी कर्जदारांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवणारे कुबडे ज्वेलर्सचे प्रमुख असलेले सावकार महादेव कुबडे हे पसार झाले आहेत. शहर कोतवाली पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
चौकशीला गती देण्यासाठी आणि प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी महादेव कुबडे यांना विनाविलंब अटक करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही सर्वंकष प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती कोतवालीचे ठाणेदार विजय पाटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अमरावती तालुका सहकारी संस्थेचे उपनिबंधक राजेंन्द्र तुकाराम पालेकर यांनी महादेव कुबडे यांच्याविरुद्ध गुरुवारी फौजदारी तक्रार नोंदविली. त्या तक्रारीवरून कुबडेंविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे नोंदविण्यात आलेत. प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी कुबडेंना अटक करणे क्रमप्राप्त आहे. त्यांना अटक केल्यानंतरच या प्रकरणाचे वास्तव उघड होईल, असे मत ठाणेदार पाटकर यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.
सावकारी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या ६२० कर्जदार शेतकऱ्यांची जबाबदारी आपलीच असल्याचा दावा कुबडे ज्वेलर्सकडून करण्यात आला. तथापि जबाबदारी म्हणजे नेमकी काय, हे अनुत्तरित आहे. ६२० कर्जदारांपैकी कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकरी कर्जदारांचे गहाण असलेले सोने कुबडे ज्वेलर्स विनाव्याज परत करणार आहेत काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. ६२० कर्जदारांची नावे नजरचुकीने सुटत असतील तर, कुबडे ज्वेलर्सच्या सावकारी व्यवहाराची व्यापकता डोळे विस्फारणारी ठरते. सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने कर्जमाफीचे स्वागतार्ह पाऊल उचलले. मात्र, त्या योजनेच्या अंमलबजावणीला कुबडे ज्वेलर्सने हरताळ फासला. चौकशीदरम्यान कुबडेंकडून सावकारी व्यवहाराचा संपूर्ण लेखाजोखा घेतला जाणार आहे.
सावकार प्रफुल्ल फुकेविरुद्धही गुन्हे : चांदुरबाजार तालुक्यातील जैनपुर येथील प्रफुल्ल रामेश्वर फुके या सावकाराविरुध्द चांदुरबाजार पोलिसांनी भादंविच्या कलम ४६८, ४६४, ४७१, ४७४, ४२० अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. सहकारी संस्थेचे सहायक निबंधक किशोर बलिंगे यांनी याप्रकरणी सरकारतर्फे फौजदारी तक्रार नोंदविली. आरोपी फुके याने संजय अढाऊ व अन्य सात कर्जदारांचे १८६ ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेऊन परत केले नाही. त्यामुळे हे आठ कर्जदार शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले. आरोपी फुकेने आठ शेतकरी कर्जदारांना ३ लाख ६४ हजारांचे कर्ज दिले होते. मात्र, कर्जमाफी योजनेबाबत खोटी माहिती देऊन त्यांचे गहाण दागिने परत केले नाही. त्याचवेळी त्यांच्याकडून मूळ पावत्या, आधार कार्ड, सातबारा, ८ अ हा दस्ताऐवज घेतला. आरोपी फुकेने कर्जदारास द्यावयाच्या पावती छापून त्यावर सावकारी व्यवसाय केला, तथा शासनाचा महसूल बुडून शासन आणि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

शेत हडपले, अग्रवालविरुद्ध गुन्हा
अवैध सावकारी करून शेत हडपल्याबाबत खापर्डे बगिचा येथील कैलास हिरालाल अग्रवाल या सावकाराविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये गुन्हा नोंदविला. सहकार अधिकारी अविनाश महल्ले यांनी याबाबत तक्रार नोंदविली. १३ फेब्रुवारी २००२ ते १७ जुन २०१४ दरम्यान कैलास अग्रवाल याने अवैध सावकारी करुन आपले शेत हडपल्याची तक्रार सुखदेव राखोडे (पुर्णानगर)यांनी सहकार विभागाकडे केली होती. प्राथमिक चौकशीदरम्यान कैलास अग्रवाल दोषी आढळल्याने त्याचेविरुद्ध भादंविचे कलम ४६८ आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

वंडलीच्या शेतकऱ्याचे शेत हडपले
अवैध सावकारी करून शेत हडपल्याची घटना गुरुवारी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. सरकारतर्फे सहकार अधिकारी प्रभाकर शंकर ढोबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन मारोतराव मते (रा. मुधोळकर पेठ) या सावकाराविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. भातकुली तालुक्यातील वंडली येथील मनीष उमेशराव उघडे यांनी मते यांच्याविरुध्द सहकार अधिकाऱ्यांकडे अवैध सावकारीबाबत तक्रार नोंदविली होती. तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत अवैध सावकारीचा प्रकार उघड झाला. १४ नोव्हेंबर २०१४ ते ५ जानेवारी २०१६ दरम्यान खरेदी-विक्री कार्यालयात हा व्यवहार झाला होता.

शेतकऱ्यांना सावकारी कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या सावकारांविरुद्ध आतापर्यंत १२ एफआयआर नोंदविले आहेत. तक्रारींमधील सत्यता तपासून फौजदारी तक्रारी करण्यात येत आहेत.
- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

सावकारी नियमन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या महादेव कुबडेस अटक करून प्रकरणाची वस्तुस्थिती तपासू. सत्यता तपासण्यासाठी त्यांच्या प्रतिष्ठानातील कर्मचारी व शेजाऱ्यांचे बयाण नोंदविण्यात येईल.
विजय पाटकर, निरीक्षक, कोतवाली ठाणे

Web Title: Humpbacks, police leads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.