लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाची तिसरी लाट बालकांकरिता धोक्याची ठरणार असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे. त्यानुसार तिसऱ्या लाटेचा सामना करताना शासकीय रुग्णालयांत बालरोगतज्ज्ञांची संख्या तोकडी पडणार असल्याने तिसरी लाट रोखणार कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.अमरावती जिल्ह्यात ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३३० उपकेंद्र आहेत. इर्विन रुग्णालय, डफरीन रुग्णालयास चार उपजिल्हा रुग्णालयांत पेडियाट्रिक विभाग आहेत. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयांतर्गत इर्विनमध्ये ४, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, वरूड आणि धारणी उपजिल्हा रुग्णालयांत प्रत्येकी पाच बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती केलेली आहे. त्याशिवाय एनएचएम (राष्ट्रीय आरोग्य अभियान) अंतर्गत २६ पैकी २३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यापैकी एनएचएम, एसएनसीयू, एनआयसीएच अंतर्गत ९ डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे. या ठिकाणी काम करताना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बालरोगतज्ज्ञांची पदेच नाहीत. यामुळे तिसरी लाट आलीच तर या केंद्रांवर बालरोगतज्ज्ञांविना उपचार कसे होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.ग्रामीण आणि शहरी भागाचा विचार करता बालरोगतज्ज्ञांचा हा आकडा अपुरा आहे. तिसऱ्या लाटेत उपलब्ध मनुष्यबळ तोकडे पडणार आहे. यामुळे शासकीय यंत्रणेला तात्पूर्त्या स्वरूपाचे बालरोगतज्ज्ञ नियुक्त करावे लागणार आहे.
जिल्ह्यात ऑक्सिजन बेड ६८५जिल्ह्यात आयसीयूमध्ये ५१९ बेड आहेत. ऑक्सिजन बेडची संख्या ६८५ आहेत. सामान्य बेडची संख्या ५२५ आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये एकूण १३१५ बेड असून, ९६९ बेड रिक्त आहेत. सुपर स्पेशालिटीतील कोविड सेंटरमध्ये एकूण २५१५ बेडपैकी १३४७ बेड रिक्त असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त झाली.
तालुकास्तरावर १० खाटांचे नियोजन- तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फटका बसणार असल्याचे मत नोंदविले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात जवळपास ४०० बालके कोरोना संक्रमित झाले. ही आकडेवारी बघता प्रत्येक तालुक्यात १० खाटांचे नियोजन केल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.- ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता जिल्हास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आले आहे. शिवाय अतिरिक्त साठवण व्यवस्थाही तयार करण्यात आली आहे. तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांटवर भर देण्यात येत आहे. तेथून ऑक्सिजन वळते करावे लागणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात ९० बेडडॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या पेडियाट्रिक विभागात ९० बेड आहेत. एनआयसीयू - १७ बेड, पीआयसीयूमध्ये १० ची व्यवस्था असून, मनुष्यबळ पुरेसे असल्याचे अधिष्ठाता अनिल देशमुख म्हणाले.