‘डेल्टा प्लस’चा संसर्ग कसा रोखणार? दोन्ही डोस घेणारे केवळ पाच टक्के!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST2021-07-05T05:00:00+5:302021-07-05T05:00:39+5:30
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून पाच टप्प्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरणाची मोहीम मंदावली. अर्धेअधिक केंद्र बंदच राहतात. शहरातील केंद्रांवर गर्दी राहत असल्यामुळे नागरिक पहाटेपासून रांगा लावतात. या आठवड्यात सर्वाधिक मागणी असलेल्या कोविशिल्डचा ठणठणाट असल्याने शनिवारी स्टॉक उपलब्ध होताच पुन्हा रांगा लागल्या.

‘डेल्टा प्लस’चा संसर्ग कसा रोखणार? दोन्ही डोस घेणारे केवळ पाच टक्के!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचा उत्परिवर्तन झालेल्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये लसीकरण सर्वांत प्रभावी आहे. जिल्ह्यात मात्र आतापर्यंत २१ टक्केच लसीकरण झाले आहे. यात पहिला डोस घेणारे १६ टक्के व दुसरा डोस घेणारे फक्त ५ टक्केच नागरिक आहेत.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून पाच टप्प्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरणाची मोहीम मंदावली. अर्धेअधिक केंद्र बंदच राहतात. शहरातील केंद्रांवर गर्दी राहत असल्यामुळे नागरिक पहाटेपासून रांगा लावतात. या आठवड्यात सर्वाधिक मागणी असलेल्या कोविशिल्डचा ठणठणाट असल्याने शनिवारी स्टॉक उपलब्ध होताच पुन्हा रांगा लागल्या.
जिल्ह्यात आजपर्यंत फक्त ६,४६,०१३ नागरिकांचेच लसीकरण व ६,५७,०४० लसींचा पुरवठा करण्यात आला. यात ५,०६,३३० कोविशिल्ड तर १,५०७१० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १०२ केंद्र आहेत. यात १९ केंद्रे महापालिका क्षेत्रातील आहेत. ऑनलाईन नोंदणी करताना स्लाॅट मिळत नाही. अगदी दोन मिनिटांत तेथील कोटा फुल्ल होत आहे. पुन्हा नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने हा कंटाळवाणा ‘फास्टेट फिंगर’चा खेळ ठरला आहे.
१८ ते ४४ गटात फक्त तीन टक्केच
- १८ ते ४४ वयोगट फार महत्त्वाचा असताना या गटात आतापर्यंत ८४,३१२ नागरिकांचेच लसीकरण झाले आहे. यात पहिला डोस ७३,४१४ व दुसरा डोस फक्त १०,८९८ नागरिकांनीच घेतला.
- या गटात कोविशिल्डचे १,७६,८६५ व कोव्हॅक्सिनचे १०,८९८ नागरिकांचे लसीकरण झाले असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
ज्येष्ठ नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण
जिल्ह्यात पाच वर्गवारीत लसीकरण होत असले तरी यात सर्वाधिक लसीकरण ज्येष्ठ नागरिकांचे झालेले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पहिला डोस १,७२,१८६ व दुसरा डोस ७२,९२४ ज्येष्ठ नागरिकांनी घेतल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. सुरुवातीला याच वर्गासाठी होत असलेले लसीकरण संथ झाले होते.