शासनादेश डावलून परीक्षा कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:17+5:302021-04-10T04:12:17+5:30
मोर्शी : शासन निर्णयाच्या विरोधात जाऊन येथील खासगी कॉन्व्हेन्ट शाळा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत असून, शासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, ...

शासनादेश डावलून परीक्षा कशी?
मोर्शी : शासन निर्णयाच्या विरोधात जाऊन येथील खासगी कॉन्व्हेन्ट शाळा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत असून, शासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक नितीन उमाळे यांच्यासह पालकांनी केली आहे.
शहरातील नामांकित कॉन्व्हेन्ट शाळांसोबतच अनेक कॉन्व्हेन्ट मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करतात. सत्र २०२०-२१ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रत्यक्षात वर्ग झालेच नाही, काहींनी ऑनलाईन शिकवणी सुरू केली होती. तथापि, या शिकवणीचा विद्यार्थ्यांवर अपेक्षित परिणाम झाला नाही. प्रत्यक्षात वर्गखोलीत शिक्षण झाले नाही म्हणून विद्यार्थी शिक्षणाचा दर्जा प्राप्त करू शकले नाही. ही वस्तुस्थिती आहे. पूर्ण सत्र विद्यार्थी घरी राहिले असतानाही राज्य शासनाने पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्याचे जाहीर केले. दुसरीकडे वर्षभर शाळेत न गेलेल्या आणि ऑनलाईन शिक्षण घेतलेल्या शहरातील कॉन्व्हेन्टच्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्षात घरी बसून परीक्षा घेण्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून उत्तरपत्रिका दिली जात आहे. विद्यार्थ्यांनी ही उत्तरपत्रिका घरी सोडवून ती शाळेत जमा करावयाची आहे. त्यानंतरच मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे कॉन्व्हेन्टवतीने बोलले जात आहे.
शुल्क वसुलीसाठी हा फंडा
वर्षभर विद्यार्थी शाळेत गेले नसल्यामुळे या खासगी कॉन्व्हेन्टचे शुल्क विद्यार्थ्याकडे पडून आहे. विद्यार्थ्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश दिल्यास या वर्षाचे शुल्क वसूल करावयाचे राहून जाईल. या भूमिकेतून या कॉन्व्हेन्ट शाळांनी पेपर घेण्याची शक्कल लढविली आहे. प्रश्नपत्रिका घेण्यासाठी शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून प्रथम वर्षभराचे शुल्क वसूल केले जातात. त्याशिवाय पेपर दिला जात नाही. या बाबीची जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घेऊन अशा शाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगर परिषद सदस्य नितीन उमाळे यांच्यासह अनेक पालकांनी केली आहे.
------------------------