‘ओन रिस्क’वर वाहन पार्किंग कसे?
By Admin | Updated: November 5, 2016 00:09 IST2016-11-05T00:09:17+5:302016-11-05T00:09:17+5:30
दिवसाकाठी लक्षावधी रूपयांचा व्यवसाय करणाऱ्या ‘रिलायंस ट्रेन्डझ’ने पार्किंगबाबत मुजोरी चालविली आहे.

‘ओन रिस्क’वर वाहन पार्किंग कसे?
‘रिलायन्स ट्रेन्डझ’ची मुजोरी : वाहनस्थळाची जबाबदारी कुबडे हाईट्सची
अमरावती : दिवसाकाठी लक्षावधी रूपयांचा व्यवसाय करणाऱ्या ‘रिलायंस ट्रेन्डझ’ने पार्किंगबाबत मुजोरी चालविली आहे. कुबडे हाईट्सने आम्हाला पार्किंगची जागा दिली नसल्याने आम्ही अधिकृत पार्किंग स्थळ उपलब्ध करून देण्यासाठी बांधिल नसल्याचा पवित्रा मॉलच्या कर्त्याधर्त्यांनी घेतला असून ‘पार्किंग आॅन ओन रिस्क’चा सल्ला रिलायन्स ट्रेंडझने दिला आहे. त्यावर ग्राहकांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे.
‘रिलायन्स ट्रेंडझ’ने पार्किंग व्यवस्थेकरिता कुबडे हाईटस्च्या संचालकांकडे अंगुलीनिर्देश करीत ग्राहक त्यांची वाहने कुबडे ज्वेलर्ससमोरील जागेत ठेऊ शकतात, असा फुकटचा सल्ला देखील दिला आहे. बांधकामाची परवानगी घेताना महापालिकेने पार्किंग व्यवस्था बंधनकारक केली आहे. येथे कुबडे ज्वेलर्सने स्वत:साठी व पोटभाडेकरू असलेल्या हॉटेलसाठी पार्किंग स्थळ उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या दोन प्रतिष्ठांनाव्यतिरिक्त येथे अन्य वाहन पार्क करू नये, असा सूचनाफलकच येथे लावण्यात आला आहे. ‘रिलायंस ट्रेन्डझ’च्या ग्राहकांना येथे वाहन ठेवण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे ग्राहकांना नाईलाजाने अनधिकृत पार्किंग करावे लागते. अनेकदा वाहतूक शाखेकडून ग्राहकांच्या दुचाकी उचलून नेल्या जातात.
ही तर ग्राहक हक्कांची अवहेलना
अमरावती : रिलायंस ट्रेन्डस या महागड्या मॉलमध्ये नेहमीच ‘पार्किंग आॅन ओन रिस्क’ अशी फलके झळकतात. ग्राहक हक्काची अवहेलना करणारा हा प्रकार आहे.ग्राहकाला विविध प्रलोभने देऊन आपल्या प्रतिष्ठानातून खरेदीसाठी उद्युक्त करायचे आणि वरून ग्राहकांच्या पार्किंगची पार्किंगची जबाबदारी धुडकावून लावायची, ही कुठली ग्राहकाभिमुखता? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
असा आहे फलक
‘रिलायंस ट्रेन्डझ’ कुबडे हाईटसमध्ये स्थापित आहे. मात्र, येथे पार्किंगची सोय नाही. ग्राहक त्यांची वाहने खालच्या अधिकृत पार्किंगमध्ये लाऊ शकतात, असे सांगितले जाते. मात्र, ‘हे पार्किंग फक्त कुबडे ज्वेलर्स व रॅलिश रेसिडेन्सीसाठी उपलब्ध आहे. इतर कोणतेही वाहन येथे पार्क केल्यास जबाबदारी आमची राहणार नाही, आदेशानुसार- कुबडे हाईट्स’ असा फलक येथे लावण्यात आला आहे. त्यामुळे धनदांडग्या रिलायन्स ट्रेन्डझकडे पार्किंग उपलब्ध नसल्याचे स्पष्ट होते. पार्किंग नसतानाही सरकारी जागेवर अतिक्रमण करून या प्रतिष्ठानधारकांनी मुजोरी चालविली आहे.