किती रे छळशील मेघराजा...!
By Admin | Updated: July 13, 2015 00:26 IST2015-07-13T00:26:02+5:302015-07-13T00:26:02+5:30
रोहिणी, मृग व आर्द्रा व पावसाचे तीनही नक्षत्र कोरडे गेलेत. किती दिवसांपासून आम्ही प्रतीक्षेत आहोत. आस लावून बसलो आहोत.

किती रे छळशील मेघराजा...!
गजानन मोहोड अमरावती
रोहिणी, मृग व आर्द्रा व पावसाचे तीनही नक्षत्र कोरडे गेलेत. किती दिवसांपासून आम्ही प्रतीक्षेत आहोत. आस लावून बसलो आहोत. कधी तू शिरकावा देतो की पुन्हा गायब होतो? किती छळशील रे मेघराजा असा आर्जव बळीराजाने केले आहे.
जिल्ह्यात ७७ टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या पिकांची रोपे माना टाकत आहे. नंतरची पेरणी झालेले बियाण्यांचे अंकूर आद्रतेअभावी करपत आहे.
पेरणी आटपून शेतकरी, वारकरी हे विठूरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात, पांडुरंगाला समृद्धीचे साकडे घालतात. वारी करून आल्यावर पीक हे चांगलेच वर आलेले आहे तेव्हा उवरणी, निंदन आदी सोपस्कार आटोपतात परंतु यंदा मात्र उलटेच आहे. वारकरी यंदा माऊलीकडे पेरणीयोग्य पाऊस पडावा म्हणून साकडे घालण्यासाठी वारी करीत आहे.
‘नको पांडुरंगा मला
सोन्या-चांदीचे दान रे।
भिजव पांडुरंगा तहानलेले रान रे।।
या भजनासह टाळ-मृदंगाच्या साथीने माऊलीच्या नामघोषात तल्लीन होऊन पांडूरंगाच्या दर्शनासाठी हजारो मैलाची पायपीट करत शेतकरी वारकरी पंढरीच्या वाटेने आहेत.
पीककर्जाची गती मंद, पुनर्गठनही रखडले
अमरावती : माऊलीच्या दर्शनाची आस असलेला प्रत्येक शेतकरी, वारकरी पावसासाठी माऊलीला आर्जव करीत आहेत.
जिल्ह्यात साधारणपणे २० ते २५ जूनदरम्यान खरिपाची पूर्ण पेरणी व्हायला पाहिजे. मात्र त्यानंतरही दोन आठवडे उलटून गेलेत. जेमतेम ७६ टक्के पेरणी झाली आहे. २३ जूननंतर पावसाची प्रदीर्घ दडी आहे. बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे.
दुष्काळी स्थितीमुळे सन २०१४-१५ पीक कर्जाचे ५ वर्षांमध्ये रुपांतरण व नव्याने पीककर्जाचे आदेश शासनाने दिले. मात्र जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी अजूनही ५० टक्क्यांवर शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केलेले नाही व पीक कर्जाचा टक्का देखील ६० टक्यांवर वाढला नसल्याची शोकांतिका आहे.