छाप्यादरम्यान जुगारचालक निसटतात कसे? पंटरच गळाला

By प्रदीप भाकरे | Published: January 20, 2024 04:22 PM2024-01-20T16:22:56+5:302024-01-20T16:23:30+5:30

दोन्ही ठिकाणाहून केवळ चिठठ्या लिहिणारे तेवढे १२ जण सीआययूच्या हाती लागले.

How do gamblers escape during raids? Their men arrested | छाप्यादरम्यान जुगारचालक निसटतात कसे? पंटरच गळाला

छाप्यादरम्यान जुगारचालक निसटतात कसे? पंटरच गळाला

अमरावती: कोतवाली हद्दीतील वसंत चौक व फ्रेजरपुरा हद्दीतील चपराशीपुरा येथे घातलेल्या धाडीदरम्यान मुख्य जुगारचालक फरार होण्यात यशस्वी झाले असताना सलग दुसऱ्या दिवशी देखील इतवारा बाजार व पठान चौकात सुरू असलेल्या जुगाराचे कर्तेकरविते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दोन्ही ठिकाणाहून केवळ चिठठ्या लिहिणारे तेवढे १२ जण सीआययूच्या हाती लागले. त्यांच्याकडून दोन कारवाईतून २२ हजार ६६० रुपये रोख व जुगाराच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या.

पोलीस आयुक्तांचे सीआययू पथक १९ जानेवारी रोजी दुपारी कोतवाली हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना इतवारा बाजार येथे शेख रहीम शेख अहमद हा अवैधरीत्या वरली मटक्याच्या आकड्यावर लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवित असल्याची माहिती त्यांना मिळाली. पथक पोहोचताच शेख रहीम शेख अहमद हा तेथून पळून गेला. त्यावेळी तेथून वरली मटका लिहिणारे मनोज साहू, शेख बाबू, शेख रियाज, पप्पु पांडे, शुभम वानखडे व नरेश खोब्रागडे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व १३हजार २१० रुपये रोख जप्त करण्यात आली. जुगाऱ्यांविरूध्द शहर कोतवाली पोलिसांत दुपारी ५.४८ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

अ. फारूकच्या धंदयावर धाड

२० जानेवारी रोजी दुपारी सीआययूने नागपुरी गेट हद्दीतील पठाण चौकस्थितअब्दुल फारुक अब्दुल गणी याच्या अवैध जुगार अड्डयावर धाड घातली. तेथून त्याच्याव्यतिरिक्त मनोद सरोदे, अमित पांडे, ज्ञानेश्वर आमझरे, मोहम्मद सलीम, गोपालस्वामी कटियार व हफिज खान यांना ताब्यात घेण्यात आले. तेथून ९४५० रुपये रोख जप्त करण्यात आली. त्यांच्याविरूध्द नागपुरी गेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र इंगळे व उपनिरिक्षक गजानन राजमल्लू यांच्या नेतृत्वातील टिम ‘सीआययू’ने ही कारवाई केली.

Web Title: How do gamblers escape during raids? Their men arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.