नरबळीच्या पुजेत तिघेच कसे ?
By Admin | Updated: August 19, 2016 00:12 IST2016-08-19T00:12:39+5:302016-08-19T00:12:39+5:30
अलौकीक शक्ती प्राप्त करण्यासाठी नरबळीचा जो प्रयत्न शंकर महाराजांच्या आश्रमात करण्यात आला,

नरबळीच्या पुजेत तिघेच कसे ?
अमरावती : अलौकीक शक्ती प्राप्त करण्यासाठी नरबळीचा जो प्रयत्न शंकर महाराजांच्या आश्रमात करण्यात आला, त्या नरबळीच्या विधीत तिघांचाच सहभाग कसा, हा प्रश्न या प्रकारातील गुन्ह्यांचा अभ्यास केल्यावर निर्माण होतो. पोलिसांनाही हा प्रश्न निर्माण झाल्यास आणखी धक्कादायक वास्तव उघड होऊ शकेल.
नरबळी, अघोरी विद्या, काळी जादू यासंबंधीच्या संकल्पना आणि त्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या विधी-पुजांमध्ये संख्येने तीनपेक्षा अधिक लोकांचा भरणा असल्याचेच प्रकर्षाने स्पष्ट होते. अलौकीक शक्ती, गुप्तधनाचा शोध, नोटांचा पाऊस असल्या प्रकारांसाठी नरबळी दिले जातात. मुळात हे सारे थोतांड असले तरी मनगटात ताकद अन् स्वकर्तृत्वावर विश्वास नसलेली मंडळी बाबा, बुवा किंवा महाराजांच्या मागे लागून या प्रकारांवर विश्वास ठेवतात. ही विद्या अस्तित्वात आहे, ही अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांमध्ये सुशिक्षित आणि प्रतिष्ठीत लोकांचाही टक्का दखलनीय आहे. महाराष्ट्र राज्यासह देशभरात या प्रकारचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
गोंडस, निरागस, पवित्र तसेच पायाळू मुला-मुलींचा नरबळी दिल्याने विशेष शक्ती प्राप्त होतात, असे ही मंडळी मानतात. आत्मविश्वास गमावलेले असले लोक अशी विद्या जाणणाऱ्या महाराजांच्या नादी लागतात. भान हरपलेली ही मंडळी गुरूमहाराजाने सांगितल्यानुसार कुठलाही गुन्हा करायला तयार होतात. अगदी पोटच्या मुलांचे बळी दिल्याचेही गुन्हे उघडकीस आले आहेत. असली मंडळी नरबळी हा विधीवत आणि अत्यंत धार्मिक प्रकार मानतात. बळी चढविल्या जाणाऱ्या व्यक्तीचीही पुजा केली जाते. त्याच्या पवित्र रक्ताची आहुती आणि छाटलेल्या मुंडक्याची पुजा केली जात असल्याच्याही नोंदी उपलब्ध आहेत. अमावस्या, पौर्णिमा किंवा विशिष्ट सणांच्याच मुहूर्तावर केलेली पूजा शक्ती प्रदान करते, अशी अंधश्रद्धा आहे.
नरबळीच्या गुन्ह्यांमध्ये नरबळी देणाऱ्या व्यक्तिंच्या पाठीशी त्यांचे गुरु असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. नरबळी घडवून आणणारे मोहरे असतात. त्यांना 'आॅपरेट' करणारे, बहुदा वयस्क श्रेणीतील व्यक्ती या घटनेतील मुख्य सुत्रधार असतात.