दुपारचे दोन वाजले तरी लग्नात कसे पोहोचले नाही?
By Admin | Updated: August 7, 2015 00:20 IST2015-08-07T00:20:46+5:302015-08-07T00:20:46+5:30
लग्नाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी आजनकर परिवार कारने यवतमाळातून उत्साहात रवाना झाला.

दुपारचे दोन वाजले तरी लग्नात कसे पोहोचले नाही?
लग्नाला जाताना आजनकर कुटुंबावर काळाचा घाला
अमरावती : लग्नाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बुधवारी सकाळी आजनकर परिवार कारने यवतमाळातून उत्साहात रवाना झाला. दुपारचे २ वाजले तरी लग्नघरी कसे पोहोचले नाहीत, अशी शंका यवतमाळात असलेल्या लहान भावाच्या मनात आली. त्याने दोनही भावांच्या मोबाईलवर संपर्क केला. प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी भावाने दुचाकी काढून शोध सुरू केला. नातेवाईकही शोध मोहिमेत सहभागी झालेत. अखेर ज्याचे भय होते तेच झाले. तिवसा तालुक्यातील नाल्याच्या पुरात कारसह चौघेही वाहून गेल्याचे स्पष्ट झाले. ही वार्ता कळताच वृद्ध पित्यासह सर्वच हादरले. सकाळी आनंदात गेलेल्या चौघांचे कलेवर पाहण्याचीच वेळ यवतमाळातील रेणुकानगरावर आली. चांदूररेल्वे येथील गजाननच्या साडुच्या मुलाचे आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथे बुधवार सकाळी ११ वाजता लग्न होते. संजयच्या अल्टो कारने (क्र. एम.एच-२९-एडी-४४९६) आजनकर परिवार वर्धमनेरीकडे सकाळी ७ वाजता रवाना झाला होता.
चांदूररेल्वेत शोककळा
आजनकर परिवारातील नातेवाईक, चांदूररेल्वे येथील धनराज होले यांचे बुधवारी ५ आॅगस्टला वर्धमनेरी येथे लग्न होते. त्याच ठिकाणी आजनकर परिवार जात होता. दरम्यान ही दुर्दैवी घटना झाली. चौघांचेही शवविच्छेदन चांदूररेल्वे येथेच झाल्याने नातेवाईकांसह नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेमुळे चांदूररेल्वे शहरात शोककळा पसरली आहे.
सान्वीचे होमवर्क राहूनच गेले!
पुरात वाहून गेलेल्या कारमध्ये मृत्युमुखी पडलेली सान्वी यवतमाळच्या जांब मार्गावरील आदर्श कॉन्व्हेंटमध्ये केजी-२ ला शिकत होती. मंगळवारी तिच्या वर्ग शिक्षिका वैशाली पाटणे हिने तिला होमवर्कबाबत विचारले होते. ‘आम्ही उद्या गावी जाणार आहोत. त्यानंतर होमवर्क दाखविते’, असे सान्वी म्हणाली होती. मात्र गुरुवारी तिच्या मृत्यूचीच वार्ता शाळेत धडकली आणि आदर्श कॉन्व्हेंटमध्ये शोककळा पसरली.
मुलाला वाचविण्यासाठी
दिली होती प्राणांची आहुती
आजनकर परिवारावर नियतीने दुसऱ्यांदा क्रूर आघात केला. सहा महिन्यांपूर्वी पशुवैद्यक संजय आजनकर यांची पत्नी स्वाती यांनी मधमाश्यांचा हल्ला अंगावर झेलून प्राणांची आहुती दिली. कळंब तालुक्यातील निरंजन माहूर येथे दर्शनासाठी त्या परिवारासह गेल्या होत्या. त्यावेळी झाडावरील मधमाश्यांचे पोळ उठले. स्वाती यांच्या मांडीवर असलेल्या चिमुकल्या श्रीपाद नामक मुलाला मधमाशा चावू नयेत म्हणून त्याला शरीराच्या कवचाखाली सुरक्षित ठेऊन मधमाश्यांचा मारा त्या शूर आईने स्वत:वर झेलला. मधमाश्यांच्या असंख्य डंखाने गंभीर अवस्थेत रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेपाठोपाठ आता दुसरा भयंकर आघात या कुटुंबावर झाला.