लॉकडाऊनमध्ये डांबरीकरण कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:22 IST2021-02-28T04:22:26+5:302021-02-28T04:22:26+5:30
कोरोना नियमांची ऐसीतैसी : ग्रामपंचायत, कंत्राटदारांसाठी वेगळा न्याय परतवाडा : अचलपूर तालुक्यासह परतवाडा शहरात कोरोनाचा उद्रेक होत असताना सार्वजनिक ...

लॉकडाऊनमध्ये डांबरीकरण कसे?
कोरोना नियमांची ऐसीतैसी : ग्रामपंचायत, कंत्राटदारांसाठी वेगळा न्याय
परतवाडा : अचलपूर तालुक्यासह परतवाडा शहरात कोरोनाचा उद्रेक होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदारांकडून कोविड नियमांची पायमल्ली सुरू असल्याचा प्रकार पुढे आला आहे. रात्रीला डांबरीकरण केले जात असल्याने संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. त्या आदेशाच्या आधारे देवमाळी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या बांधकामावर दंडाचा बडगा उगारण्यात आला. फौजदारी तक्रारदेखील करण्यात आली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांकडून मजुरांचा वापर करून सर्रास डांबरीकरणाचे काम केले जात आहे.
अचलपूर तालुक्यातील चांदूर बाजार नाका ते रासेगाव बायपास रोड दुरुस्तीचे काम सुरू आहे. सदर रस्त्यावर ४० पेक्षा अधिक मजूर ट्रक रोलर व इतर यंत्र वापरत असून, २५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास डांबरीकरणाचे काम सुरू होते. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धीरज निंभोरकर यांनी अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली आहे.
बॉक्स
कंत्राटदारासाठी वेगळे नियम आहे का?
रस्ता डांबरीकरण कामात नियमाने सायंकाळी ६ नंतर सर्व कामे बंद केली जातात. मात्र, तालुक्यात कोरोनाचा उद्रेक असताना शासनाच्या नियमावलीचे पालन कुठल्याच प्रकारे न करता, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदार यांच्यासाठी वेगळे नियम करण्यात आले आहे का, असा प्रश्न तक्रारीतून करण्यात आला आहे.
---------------------