मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या घिरट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:12 IST2017-02-22T00:12:28+5:302017-02-22T00:12:28+5:30

मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आतील परिसरात फिरण्यास बंदी असतानाही अनेक उमेदवार मतदान केंद्रांवर घिरट्या घालीत प्रचार करताना आढळून आले.

Hovering on the polling stations | मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या घिरट्या

मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या घिरट्या

नियम डावलून १०० मीटरच्या आत प्रचार : पोलीस आयुक्तांकडे तक्रारींचे ‘कॉल’
अमरावती : मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आतील परिसरात फिरण्यास बंदी असतानाही अनेक उमेदवार मतदान केंद्रांवर घिरट्या घालीत प्रचार करताना आढळून आले. याबाबत अन्य उमेदवार व कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे दूरध्वनीवरून तक्रार केली. मात्र, हा प्रकार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पाहून मतदान केंद्रावरून उमेदवारांनी काढता पाय घेतला. मंगळवारी शहरातील बहुंताश मतदान केंद्रांवर हाप्रकार बघायला मिळाला.
महापालिका निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेला मंगळवारी सकाळी सुरूवात झाली. सकाळच्यावेळी केंद्रांवर गर्दी कमी असली तरी दुपारी मतदारांचा ओघ वाढला. दरम्यान ्अनेक केंद्रांवर उमेदवारांनी मतदारांना मतदानाबाबत छुपे मार्गदर्शन सुरूच ठेवले होते. हाप्रचार मतदारांच्या घरापासूनच सुरु झाला. काही उमेदवारांनी तर चक्क मतदान केंद्रांवर घिरट्या घालण्यास सुरुवात केली. उमेदवारांना मतदानकेंद्रांवर जाऊन प्रक्रिया सुरळीत सुरु आहे किंवा नाही, याची शहानिशा करण्याचे अधिकार आहेत. मात्र, केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणताही उमेदवार मतदारांना भेटून प्रचार करू शकत नाही. मात्र, मंगळवारी अनेक मतदान केंद्रांवर असे प्रकार घडल्याने अनेक उमेदवार व कार्यकर्त्यांनी थेट पोलीस आयुक्तांच्या मोबाईलवर कॉल करून माहिती दिली आणि परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्यात. प्रशांतनगरातील प्रशांत विद्यालय, विलासनगरातील शाळा क्रमांक १७, मुजफ्फरपुरा, अलीमनगरातील शाळा क्र.७, खोलापूरी गेट परिसरातील मतदान केंद्र, रुरल कॉलेज आदी केंद्रांवर हा प्रकार घडला. याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनी वायरलेसवरून संबधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. हाप्रकार थांबविण्यासाठी तत्काळ पोलिसांचा ताफा मतदानकेंद्रांवर पाठवून उमेदवारांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र, मतदानकेंद्रांवर पोलिसांचा ताफा पोहचण्यापूर्वीच प्रचार करणाऱ्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी तेथून काढता पाय घेतल्याचे निदर्शनास आले. पोलीस पोहचताच मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत
महापालिका निवडणुकीत किरकोळ अपवाद वगळता मंगळवारी मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र, मतदान केंद्र व बाहेरील बंदोबस्तासाठी सज्ज पोलिसांची कायदा व सुव्यवस्था राखताना चांगलीच दमछाक झाली. मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणा चौकस नजर ठेऊन होती. मात्र, तरीसुद्धा काही उमेदवार व कार्यकर्त्यांनी मतदात्यांना प्रलोभन देण्याचे कार्य छुप्या मार्गाने सुरु ठेवले होते. मतदान केंद्रावर काही उमेदवारांचे किरकोळ वाद सुद्धा झाले. रुरल कॉलेज येथील मतदान केंद्रावर भाजपचे काही कार्यकर्ते मतदारांना भेटून प्रचार करीत असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांच्यासमोर असे प्रकार घडत असतानाही पोलीस कारवाई करीत नसल्याचे पाहून काही वेळ गोंधळाची स्थिती उत्पन्न झाली होती. त्यामुळे हाप्रकार थांबविण्यासाठी थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे मौखिक तक्रार करण्यात आली. दरम्यान दोन्ही गटांमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर हा वाद शांत झाला. मात्र, काही वेळ तणावसदृश वातावरण दिसून आले.

मतदारांसाठी आॅटोरिक्षाची सुविधा
मतदारांना घरापासून मतदानकेंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी आॅटोरिक्षाची सेवा नियमबाह्यपद्धतीने पुरविण्यात आली होती. मतदार घराबाहेर पडताच अनेक उमेदवार त्यांना आपल्यालाच मतदान करा, असे आवर्जुन सांगत होते. हा प्रकार सर्रास सुरू होता.

‘व्हिक्टर कॉलिंग’मुळे पोलिसांची दाणादाण
मतदानकेंद्र व बाहेरील परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. आपातकालिन स्थितीचा सामना करण्यासाठी सुद्धा स्वतंत्र पोलीस यंत्रणा सज्ज होती. मतदान सुरु झाल्यानंतर पोलीस आयुक्तांचा मोबाईल खणखणू लागला. अनेकांनी मतदान केंद्रावरून थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केल्या. तक्रारी ऐकल्यानंतर आयुक्तांनी तत्काळ सूत्रे हलवून पोलीस यंत्रणा मतदान केंद्रांवर पाठविली. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची दाणादाण उडाली होती.

एका कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळे मतदान केंद्र
महापालिका निवडणुकीच्या मतदारयादीत दरवर्षी काही ना काही त्रुटी आढळून येतात. यंदाही काही मतदानकेंद्रावरील यादीत मतदारांची नावे नसल्याचा अनुभव आला. एकाच कुटुंबातील काही सदस्यांची नावे एका मतदान केंद्रावर तर काहींची नावे दुसऱ्याच यादीत असल्याने मतदारांना वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन महत्प्रयासाने त्यांची नावे शोधावी लागली.

पैसेवाटपाच्या चर्चेला उधाण
निवडणुकीत मतदारांना आकृष्ट करण्याकरिता पैशाचे वाटप होत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. यंदाही छुप्या मार्गाने मतदारांना छुप्या मार्गाने पैसेवाटप झाल्याच्या चर्चेला शहरात उधाण आले होते. यासंबधाने प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी एका इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, अद्याप पैसेवाटप केल्याचे स्पष्ट झाले नाही.
शंभरावर
गुन्हेगार ‘डिटेन’
मतदानप्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी शंभरावर गुन्हेगारांना ‘डिटेन’ करून ठाण्यात बसवून ठेवले होते. त्यातील काही गुन्हेगार निगराणीत ठेवले होते. त्यामुळे मतदान शांततेने व पारदर्शीपणे पार पडले.

Web Title: Hovering on the polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.