गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाकडून सभासदांची फसवणूक ?
By Admin | Updated: November 17, 2015 00:25 IST2015-11-17T00:25:22+5:302015-11-17T00:25:22+5:30
स्थानिक श्री. शिवाजी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाने संस्थेच्या अधिकारात गृहनिर्माणकरिता घेतलेल्या भूखंडाचे सभासदांना वाटप करुनही हस्तांतरीत केले नाही.

गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाकडून सभासदांची फसवणूक ?
दुय्यम निबंधकांनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नये : सभासदांची वरिष्ठांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
वरुड : स्थानिक श्री. शिवाजी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाने संस्थेच्या अधिकारात गृहनिर्माणकरिता घेतलेल्या भूखंडाचे सभासदांना वाटप करुनही हस्तांतरीत केले नाही. उलट एकच भूखंड दोन नागरिकांना विकल्याचे उघड होताच फसवणूक झालेल्या २८ सभासदांनी पोलीस ठाण्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारीद्वारे कारवाईची मागणी केली आहे. संस्था निंबधकांनी सदर संस्थेच्या खरेदी, विक्रीचे व्यवहार करु नये म्हणून दुय्यम निबंधकांना पत्र सुध्दा दिले आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे श्री. शिवाजी गृहनिर्माण संस्थेची स्थापना सन १९८० मध्ये स्व.नानासाहेब कराळे यांनी केली होती. या माध्यमातून सभासदांना भूखंड देवून हक्काची घरे देण्याची योजना होती. या संस्थेमध्ये जि. प. कर्मचारी, शिक्षक, शहरातील नागरिकांनी सभासदत्व घेतले होते. कालांतराने या संस्थेची धूरा युवराज कराळे यांनी सांभाळली. यातील काही सदस्य मय्यत आहे. संस्थेने गृहनिर्माणाकरीता तिवसाघाट रस्त्यावर नागसेन बुध्द विहार असलेले शेत विकत घेतले होते. शहरापासून लांब होत असल्याने ते विकण्यात आले. यांनतर पावडे महिला महाविद्यालय असलेले शेत खरेदी करण्यात आले. परंतु १९९१ मध्ये महापूर आल्याने या शेतातून पुराचे पाणी गेल्याने हे शेत सुध्दा विकण्यात आले. यांनतर अमरावती रस्त्यावर शेत सर्व्हेनं.४३३/१,४३३/१ अ, व ४३४/२ अशी मालमत्ता संस्थेने विकत घेतली. शेत सर्व्हे नं ४३३/१ हे शेत २०१० साली ठाकरे आणि हिवसे यांना विकण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. परंतू या शेतात सभासदांचे भूखंड असल्याने सन २०१्२ मध्ये काही सभासदांनी ओरड केली होती. तर सहनिबंधक, पोलीस स्टेशनसह आदीकडे तेव्हा तक्रारी करण्यात आल्या होत्या . परंतु कारवाई झाली नाही. संस्था निबंधकाकडे १० ते १२ वेळा तारखा देण्यात आल्या. मात्र श्री.शिवाजी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्षानी दाद दिली नाही . अन्यायग्रस्त सभासदांनी पोलिसांकडे धाव घेतली. तर संस्थेच्या अध्यक्षांनी १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लेखी प्लाट देण्याचे तसेच अकृषक करण्याचे सदस्यांना लेखी दिले आहे. तसेच सर्व्हे नं ४३३/१ मध्ये प्लॉट असल्याचे दाखले देवून ते विकण्यात आले होते. यामुळे सदर सर्व्हे नं. मधील प्लॉट सर्व्हे नं ४३३/१ ‘अ’ मध्ये खुट्या गाडून दाखविण्यात आल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. वास्तविक पाहता २०१० मध्ये विकलेल्या शेतात २०१२ मध्ये प्लाट असल्याचे दाखले देवून सभासदांची फसवणूक केली. सर्व्हे नं ४३३/१अ मध्ये सभासदांचे प्लाट आहे ते शेत सुध्दा विकण्याचा सौदा केला गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. २०१० मध्ये सर्व्हे नं ४३३/१ विकलेला असुन ४३४/२ चे उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ४३४/२ व ४३३/१ अ संस्थेच्या मालकीचे भूखंड आहे. संस्थेची मालमत्ता विकताना सभा न घेता व सचिव आणि अध्यक्षांच्या बोगस सहीने ठराव घेवून मालमत्ता विकली असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे गृहनिर्माण संस्थेमध्ये सभासदांची झालेली फसवणूकीबाबत दोषींवर कारवाई करण्याची मागणीी तक्रारकर्त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनीधी)