सभागृहात गाजले जयश्री अत्याचार प्रकरण
By Admin | Updated: July 29, 2016 23:58 IST2016-07-29T23:58:47+5:302016-07-29T23:58:47+5:30
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अनेक कठोर कायदे अस्तित्वात आहेत.पण, म्हणून त्यांच्यावरील अत्याचार कमी झालेले नाहीत.

सभागृहात गाजले जयश्री अत्याचार प्रकरण
यशोमती ठाकूर आक्रमक : सभापतींनी दिले चौकशीचे आदेश
अमरावती : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अनेक कठोर कायदे अस्तित्वात आहेत.पण, म्हणून त्यांच्यावरील अत्याचार कमी झालेले नाहीत. कारण वा निमित्त कोणतेही असो दरवेळी अत्याचाराचा बळी महिलाच ठरतात, असे का? असा संतप्त सवाल आ. यशोमती ठाकूर यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधीमंडळात उपस्थित केला. जयश्री दुधे या महिलेला वर्षभर डांबून ठेवल्याचे प्रकरण सभागृहासमोर विशद करून आ. यशोमतींनी समाजातील अनेक पीडित, शोषित महिलांच्या व्यथांनाच एकप्रकारे वाचा फोडली.
सभापतींनी या गंभीर मुद्याची दखल घेवून शासनाला चौकशीचे निर्देश दिलेत. यशोमतींच्या या प्रश्नाने सभागृह अवाक झाले होते.
माहुर येथील सासरच्या मंडळींनी जयश्री दुधे हिच्यावर अनन्वित अत्याचार केलेत. एक महिला आमदार म्हणून आ. यशोमतींनी जयश्रीची भेट घेऊन तिचे सांत्वन केले. तिला धीर दिला. न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. महिलांसाठी कठोर कायदे अस्तित्वात असून सुद्धा महिलांचा येनकेनप्रकारेण होणारा छळ थांबत नाही. त्यामुळे हे कायदे अधिक कठोर करण्यासोबतच कर्तव्यदक्ष सरंक्षक अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणीही आ.यशोमती ठाकूर यांनी सभागृहात रेटून धरली. आ.ठाकूर यांनी औचित्याच्या मुद्यादरम्यान महिलांविषयक कायद्यांमध्ये बदल करून या कायद्याच्या अमंलबजावणीकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली.
महिलांसाठीच्या कायद्यात बदल हवा
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील रहिवासी जयश्री हिचा विवाह नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील रहिवासी सुरेश दुधेशी झाला. मात्र, पतीच्या मृत्युनंतर जयश्रीला अन्नपाण्याविना अंधाऱ्या खोलीत वर्षभर डांबून ठेवण्यात आले. पश्चात तीला मरणासन्न अवस्थेत माहेरी सोडून सासरची मंडळी निघून गेली. अत्याचाराची परिसिमा गाठणारा हा घटनाक्रम जाणून घेतल्यानंतर २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावरही महिला किती परावलंबी आहेत,हे आ.ठाकूर यांनी सभागृह अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिला. महिला अत्याचारविरोधी कायदे अस्तित्वात आहेत, संरक्षण अधिकारी नियुक्त आहेत. मात्र, तरीही हे कायदे तकलादू ठरत असल्याचे मत आ.ठाकूर यांनी सभागृहात मांडले. त्यामुळे कायदे करून चालणार नाही तर त्यांची अमंलबजावणी कठोरपणे व्हावी, याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी सुचविले.
सन २००४ व २००५ मधील महिलांविषयक कायद्यांमध्ये आमुलाग्र बदल व्हायला हवा, हा मुद्दा आ.ठाकूर यांनी मांडला. आज महिला- पुरुष बरोबरीने काम करीत असले तरी अत्याचार व छळाच्या बळी नेहमी महिलाचा का ठरतात? असा प्रश्न उपस्थित केला. कुंकवाचा धनी अचानक साथ सोडून गेल्यानंतर महिलांचा संपत्तीसाठी किंवा अन्य कारणांनी छळ केला जातो. ही बाब माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अत्याचारग्रस्त महिलांना फारशी मदत मिळत नसल्याची व्यथा आ.ठाकूर यांनी सभागृहात मांडली. या मुद्यावर सभागृह अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जयश्री दुधे प्रकरणी शासनाला योग्य ते निर्देश दिलेत. तसेच कायद्यात बदल करण्याविषयी आ.ठाकूर यांच्याकडून पत्र मागविले आहे.
विदर्भातील एकमेव महिला आमदार
विदर्भातून विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या यशोमती ठाकूर या एकमेव महिला आमदार आहेत. त्यामुळेच त्यांनी मांडलेल्या जयश्रीवरील अत्याचाराच्या मुद्याला आगळे महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या या लक्ष्यवेधीची सभागृहाने दखल घेतली. चौकशी करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिलेत.