खानापूर येथे घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST2021-03-10T04:15:01+5:302021-03-10T04:15:01+5:30
मोर्शी : तालुक्यातील खानापूर येथील माजी सरपंच प्रमोद अग्रवाल यांच्या तीनमजली घराच्या वरच्या माळ्याला अचानक आग लागली. यात ...

खानापूर येथे घराला आग
मोर्शी : तालुक्यातील खानापूर येथील माजी सरपंच प्रमोद अग्रवाल यांच्या तीनमजली घराच्या वरच्या माळ्याला अचानक आग लागली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. ९ मार्च रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली.
आगीने पाहता-पाहता उग्र रूप धारण करून घराला कवेत घेतले व काही क्षणाच्या आतच वरच्या माळ्यातील महत्त्वाची शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. अग्रवाल यांच्या घराला आग लागल्याची माहिती मोर्शी येथील संजय गारपवार यांना मिळताच, त्यांनी मोर्शीचे ठाणेदार संजय सोळंके यांना माहिती दिली. ठाणेदार सोळके यांच्या सूचनेवरून मोर्शी पालिकेच्या अग्निशामक दलाचे वाहन खानापूर येथे पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळविले.
प्रमोद अग्रवाल यांचे घर मोर्शी चांदूर बाजार रोडलगतच असून, ते पूर्णत: सागाच्या खांबांचे आहे. राजवाडा पद्धतीने बांधलेल्या या घरात कापूस व शेतीपयोगी महागड्या वस्तू होत्या. त्या संपूर्ण वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने या आगीत जवळपास तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रस्त्यालगत असलेल्या या घरामुळे मोर्शी चांदूर बाजार जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी अजूनपर्यंत आग कशाने लागली, हे स्पष्ट शकले नाही.