दर्यापूर-अंजनगाव पोलिसांना मिळणार हक्काचे घर
By Admin | Updated: July 5, 2015 00:20 IST2015-07-05T00:20:18+5:302015-07-05T00:20:18+5:30
बरेच दिवसांपासून पेंडिंग असलेला दर्यापूर व अंजनगाव पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे.

दर्यापूर-अंजनगाव पोलिसांना मिळणार हक्काचे घर
दर्यापूर : बरेच दिवसांपासून पेंडिंग असलेला दर्यापूर व अंजनगाव पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. पोलिसांना हक्काचे घर मिळावे याकरिता ‘लोकमत’ने अनेक वेळा वृत्त प्रकाशित करून त्याचा पाठपुरावा केला. या वृत्ताची दखल घेऊन आ. प्रकाश भारसाकळे व आ. रमेश बुंदिले यांनी केलेल्या शासन स्तरावर अथक परिश्रमानंतर अखेर दर्यापूर, अंजनगाव येथील पोलिसांचे निवासस्थान व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व त्यांचे निवासस्थान यांच्या बांधकामाला नुकतीच शासनस्तरावर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बजेटमध्ये प्रस्ताव मंजूर होऊन निधी मिळणार आहे.
दर्यापूर येथील ब्रिटिशकालीन पोलीस ठाणे आहे. परंतु दर्यापूर पोलीस ठाणे परिसरातील जागा ठाण्याच्या नावे नव्हती. ती जागा शासनाची असल्यामुळे व पोलिसांच्या नावे नसल्यामुळे सदर बांधकामाचे इस्टिमेट मंजूर करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला अडचण येत होती. त्यामुळे दर्यापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड व ठाणेदार जे. के. पवार यांच्या मदतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवून विभागीय आयुक्तांनी आदेश काढून शासनाची ही जागा अधिकृतरीत्या दर्यापूर पोलीस स्टेशनच्या नावे केली. त्यामुळे आता मंत्रालय पातळीवर यासंदर्भात नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे पुढील मार्ग मोकळा झाला. ५४ पोलिसांची निवासस्थाने, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व त्यांचे निवासस्थान दर्यापूरला होणार आहे. तसेच अंजनगाव पोलिसांचे निवासस्थाने व उपविभागीय पोलीस कार्यालय व निवासस्थान होणार आहे. पोलीस हा जनतेचा मित्र आहे. लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. परंतु दर्यापूर व अंजनगाव येथील पोलिसांच्या निवासस्थानांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. बोटावर मोजण्या इतकेच निवासस्थान शिल्लक राहिली आहेत. बाहेरगावावरून बदली होऊन आलेल्या पोलिसांना खासगी घरे मिळत नाहीत. घरभाडे दर गगनाला भिडल्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करत रहावे लागत आहे. हा प्रश्न निकाली निघत असल्यामुळे पोलीस दादांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)