घर मोजणीला गालबोट कर्मचाऱ्यांना मारहाण
By Admin | Updated: June 5, 2015 00:29 IST2015-06-05T00:29:40+5:302015-06-05T00:29:40+5:30
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या निर्देशानुसार मंगळवारपासून शहरात सुरु झालेल्या घर मोजणी अभियानाला गुरुवारी गालबोट लागले.

घर मोजणीला गालबोट कर्मचाऱ्यांना मारहाण
गाडगेनगर पोलिसांत तक्रार : पॅराडाईज कॉलनी येथील घटना
अमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या निर्देशानुसार मंगळवारपासून शहरात सुरु झालेल्या घर मोजणी अभियानाला गुरुवारी गालबोट लागले. स्थानिक पॅराडाईज कॉलनी येथे घर मोजणीला विरोध करुन चक्क कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात महापालिका कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदविली आहे.
महापालिका झोन क्र. १ अंतर्गत येणाऱ्या पॅराडाईज कॉलनी येथील रहिवासी मो.आबीद मो.कयामी यांच्या मालकीच्या इमारतीची मोजणी करण्यासाठी चमू घटनास्थळी पोहोचली. मो. आबीद यांच्या घराचे समोरचे दार बंद असल्याने त्यांनी मागील बाजूने जाऊन आवाज दिला असता घराच्या मागे उदबत्ती तयार करण्याचा कारखाना असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मो. आबीद यांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केली. आजूबाजूचे लोक याठिकाणी गोळा झाले. या प्रकाराने कर्मचारी हतबल झाले. त्यानंतर लगेच कर लिपिक भगिरथ खैरकर यांनी सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण व शिविगाळ करण्याचा प्रकार गंभीर असल्याने नरेंद्र वानखडे यांनी आयुक्त, उपायुक्तांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. त्यानंतर आयुक्तांच्या निर्देशांनुसार पोलिसांत तक्रार नोंदविली. उदबत्ती कारखाना अनधिकृत असल्यानेच कारवाईला विरोध झाल्याची चर्चा होती.
अगरबत्ती कारखान्याचे बांधकाम तपासू
पॅराडाईज कॉलनीतील मो.आबीद यांच्याकडे घरमोजणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना घराच्या मागच्या बाजूला उदबत्ती तयार करण्याचा कारखाना दिसून आला. या कारखान्याला परवानगी आहे किंवा नाही? हे तपासले जाईल. बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा आदी बाबी तपासल्यानंतर या कारखान्यावर कारवाई प्रस्तावित केली जाणार, असे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
तिसऱ्या दिवशी ११११ घरांची मोजणी
घर मोजणी अभियानात तिसऱ्या दिवशी १,१११ घरांची मोजणी करण्यात आली. यात झोन क्र.एक ते पाचमध्ये अनुक्रमे ३१०,२४९, ५२, ३४८ व१५२ घरांची मोजणी केल्याची माहिती मुख्य मूल्यांकन, कर निर्धारणअधिकारी देशमुख यांनी दिली. मोहीम निरंतर सुरु राहील, असेही त्यांनी सांगितले.