हॉटेलमधील वेटरची हत्या
By Admin | Updated: September 26, 2016 00:33 IST2016-09-26T00:33:39+5:302016-09-26T00:33:39+5:30
पार्टटाईम वेटरचे काम करणाऱ्या युवकाची चाकूने भोसकून हत्त्या करण्यात आली. या प्राणघातक हल्ल्यात अन्य दोन वेटर गंभीर जखमी झालेत.

हॉटेलमधील वेटरची हत्या
प्राणघातक हल्ला : एकाला अटक, चार आरोपी पसार
बडनेरा/ अमरावती : पार्टटाईम वेटरचे काम करणाऱ्या युवकाची चाकूने भोसकून हत्त्या करण्यात आली. या प्राणघातक हल्ल्यात अन्य दोन वेटर गंभीर जखमी झालेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री एमआयडीसी मार्गावरील ‘हॉटेल अॅनेक्स’मध्ये घडली. अजित रमेश नाईक (३६,रा.फुलआमला) असे मृताचे तर सचिन वानखडे (२१, अमरावती) व संदीप पाटील (२०,रा. अकोला, ह.मु.तपोवन) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. बडनेरा पोलिसांनी सतीश पालवे (३०,रा. जेवडनगर) याला अटक केली असून अन्य चार आरोपी पसार झाले आहेत.
बडनेरा मार्गावरील एमआयडीसी परिसरातील हॉटेल अॅनेक्समध्येही काही युवक वेटरचे काम करीत आहे. त्यामध्ये मृत अजित नाईक व जखमी सचिन वानखडे व संदीप पाटील यांचा सहभाग आहे. शनिवारी मध्यरात्री १२.४० वाजता आरोपी सतीश पालवेसह अन्य युवक हॉटेल अॅनेक्समध्ये गेला. मद्यप्राशन केल्यानंतर त्यांनी जेवणासाठी वेटरला सांगितले. मात्र, हॉटेल बंद झाल्याचे वेटरने त्यांना सांगितले. मात्र, तरीही जेवण मिळण्याबाबत वेटरकडे तगादा लावला. त्यामुळे हॉटेल संचालकांनी दोन्ही युवकांना हॉटेलबाहेर काढण्याचे आदेश दिले. वेटरने दोघांना बाहेर जाण्यास सांगितल्याने वाद उफाळून आला. आरोपींनी फोन करून त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच आरोपींसह त्यांच्या साथीदारांनी तीन्ही वेटर्सवर चाकू व तलवारींनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वेटर अजित नाईक याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी सचिन वानखडे याला खासगी रुग्णालयात तर संदीप पाटील याला नागपूर येथे हलविण्यात आले. बडनेराचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहास इर्विन रुग्णालयात आणले. याप्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सतीश पालवेला अटक केली.
आरोपींना अटक करा, नंतरच मृतदेह उचलू
शिक्षण घेऊन पार्टटाईम 'जॉब' करणाऱ्या शेकडो वेटर्सना या घटनेमुळे धक्का बसला आहे. रविवारी सकाळी जॉब करणारे शेकडो युवक इर्विनच्या शवविच्छेदनगृहासमोर जमले होते. आरोपीला अटक करा, अन्यथा मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र, पीआय पाटील यांनी युवकांची समजूत काढून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
जेवणाच्या वादातून वेटरची हत्या करण्यात आली आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपीचा शोध सुरु आहे.
- दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, बडनेरा पोलीस ठाणे.