हॉटेल हिलटॉपच्या संचालकावर हल्ला
By Admin | Updated: June 1, 2016 00:48 IST2016-06-01T00:48:26+5:302016-06-01T00:48:26+5:30
पोहरा मार्गावरील हॉटेल हिलटॉपच्या संचालकावर हल्ला चढविल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष ..

हॉटेल हिलटॉपच्या संचालकावर हल्ला
पोहरा मार्गावरील घटना : सहा जणांविरुद्ध गुन्हा
अमरावती : पोहरा मार्गावरील हॉटेल हिलटॉपच्या संचालकावर हल्ला चढविल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष संतोष बद्रेसह सहा जणांविरुध्द फे्रजरपुरा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री गुन्हा नोंदविला.
वडाळीपासून काही अंतरावर असणाऱ्या हॉटेल हिलटॉपमध्ये रात्री ११ वाजताच्या सुमारास धिरज तायडे, निखिल अर्मळ (दोन्ही राहणार राठी नगर), संतोष बद्रे व अन्य तीन ते चार जण कार एमएच २७-एसी-११८८ ने गेले होते. त्यांनी हॉटेलच्या प्रवेशद्वारासमोरच वाहन उभे करून वाहनातील टेप रेकॉर्डर मोठ्या आवाजात वाजविण्यास सुरुवात केली. त्यामुळे हॉटेल संचालक रोहित अजय गुडधे (२७,रा. चपराशी पुरा) यांनी वाहन पार्कीगमध्ये लावण्याचे सांगून टेपरेकॉडरचा आवाज कमी करण्यास सांगितले. मात्र, आरोपींनी रोहितशी हुज्जतघालत त्याच्या डोक्यावर कांचेचा ग्लास फोडला. तसेच वाहनातील बॅट, स्टील रॉड व चाकू काढून हल्ला चढविला. या हल्यात रोहित जखमी झाला. तसेच रोहितच्या वडिलांना शिवीगाळ करीत तेथून पळ काढला. या घटनेची तक्रार रोहित गुडधेने फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)