वडाळीतील पिंजऱ्याभोवती पुन्हा मादी बिबट्याच्या घिरट्या
By Admin | Updated: August 12, 2014 23:29 IST2014-08-12T23:29:37+5:302014-08-12T23:29:37+5:30
वडाळी वनपरिक्षेत्रातील कार्यालयाजवळ असणाऱ्या पिजंऱ्याभोवती पुन्हा ‘त्या’ मादी बिबटचा मुक्तसंचार सुरु झाल्याने वनकर्मचाऱ्यांमध्ये कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडाळीतील पिंजऱ्याभोवती पुन्हा मादी बिबट्याच्या घिरट्या
अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रातील कार्यालयाजवळ असणाऱ्या पिजंऱ्याभोवती पुन्हा ‘त्या’ मादी बिबटचा मुक्तसंचार सुरु झाल्याने वनकर्मचाऱ्यांमध्ये कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वडाळी वनक्षेत्राजवळील नागरिकांना सतर्कं राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
गेल्या चार वर्षापूर्वी वडाळी वनविभाग कार्यालयातील पिंजऱ्यात चंद्रपुर येथील दोन नरभक्षक बिबट बंदिस्त आहे. मात्र, या बिबटांना भेटण्यासाठी जंगलातील मिलनातुर मादी बिबट वडाळीतील पिंजऱ्याभोवती गेल्या काही वर्षात अनेकदा घिरट्या घालताना आढळून येत आहे. मादी बिबट वनविभाग कार्यालयापर्यंत पोहोचल्याने परिसरातील नागरिकांच्या वास्तव्याला धोका निर्माण होऊ नये याकरिता वनविभागाने नागरिकांना सर्तक केले आहे.ठिकठीकाणी बिबट पासून सावधान राहण्याचे बॅनर लावून नागरिकांना सतर्क केले आहे. सद्यस्थितीत पावसाळा सुरु असल्याने वनप्राण्याची प्रजननाची वेळ असल्याचे वनधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.त्यामुळेच जंगलातील मादी बिबट वडाळीतील बंदिस्त बिबटच्या गंधाने आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.मादी बिबटाचे बंदिस्त बिबटाविषयी आकर्षण पाहून वनविभागामध्ये कुतुहल निर्माण झाले असून त्या ठिकाणी असणाऱ्या चौकीदारांची झोप उडाली. बिबट सायंकाळनंतर वडाळीच्या पिंजऱ्याभोवती आढळून आल्याने त्या परिसरात फिरणाऱ्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे.या मादी बिबटचा मुक्त संचार वडाळीतील पिंजऱ्यांभोवती होत आहे. असे वृत्त लोकमतने प्रथम प्रकाशित करताच वनविभागासहीत शहरवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाकडुन नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)