तुम्ही स्वत:चा सन्मान करा, लोकही करतील!
By Admin | Updated: May 8, 2015 00:20 IST2015-05-08T00:20:33+5:302015-05-08T00:20:33+5:30
'तुम्ही स्वत:चा सन्मान करा, लोक आपसूकच तुमचा सन्मान करतील,' असा मंत्र महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी महापालिकेच्या तमाम अभियंत्यांना गुरुवारी दिला.

तुम्ही स्वत:चा सन्मान करा, लोकही करतील!
गणेश देशमुख अमरावती
'तुम्ही स्वत:चा सन्मान करा, लोक आपसूकच तुमचा सन्मान करतील,' असा मंत्र महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी महापालिकेच्या तमाम अभियंत्यांना गुरुवारी दिला.
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गुडेवार यांनी गुरुवारी पहिल्यांदाच महापालिकेच्या सुमारे ३० अभियंत्यांशी संवाद साधला. बैठकीचे हे औचित्य साधून त्यांनी मार्मिक शैलीत अभियंत्यांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान जागा करण्याचा प्रभावी प्रयत्न केला. चित्रपटात शोभावेत, असे स्वत:च्या आयुष्यातील काही अनुुभव त्यांनी अभियंत्यांशी 'शेअर' केलेत. ऐकायला औत्सुक्यपूर्ण वाटणारे हे किस्से जणू चाणक्यनीतीचा भाग असावा, इतके अर्थपूर्ण होते. प्रामाणिकच असा. कर्तव्यदक्षता तुमची शान ठरेल अन् अप्रामाणिकता शान घालवेल, असे अर्थ त्या अनुभवकथनातून वारंवार अंकित होत होते.
मी कमिश्नरच असेन !
एक महिना, दोन महिने वा वर्षभर- मी येथे राहील तितके दिवस कमिश्नर म्हणूनच राहील, अशा शब्दांत गुडेवार यांनी त्यांना अपेक्षित लोकाभिमुख, पारदर्शी आणि नियमसंगत कर्तव्याची जाणीव अभियंत्यांना करून दिली.
अभियंता कोण ?
'रॅशनल' आणि 'अॅनॅलिटकल' विचार करतो तो अभियंता. सोप्या मराठीत सांगायचे झाल्यास 'डोके चालवितो तो अभियंता.' तुम्ही अभियंता असाल तर डोके चालवून लहानसहान समस्यांवर उपाय शोधाल, अशी जाणीव गुडेवार यांनी अभियंत्यांना करून दिली. क्षुल्लक मुद्यांबाबत तक्रार करण्याऐवजी उपाय शोधण्याकडे कल असावा, असा त्यांचा त्यामागे होरा होता.
वेगाने कामे करा
अमरावती : सहा महिन्यांत विशेष वेगाने कामे करून अमरावती शहराचा चेहरा बदलत असल्याचे चित्र निर्माण करण्याची जबाबदारी गुडेवार यांनी अभियंत्यांच्या शिरावर सोपविली. अभियंत्यांनीही ती सहर्ष स्वीकारली. पावसाळ्यापर्यंत शक्य ती सर्व तांत्रिक कामे निपटवायची आणि पावसाळ्यात प्रत्यक्ष कामे कमी झालीत की धोरणात्मक कामांबाबत निर्णय घ्यायचे, असे कार्यसूत्रही गुडेवारांनी अभियंत्यांना दिले.
रस्त्यांवरील कामे तातडीने पूर्ण करा. सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले गुणवंत आणि प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असलेले अभियंते मानधनावर नेमा. ज्या रस्त्यांवर पाईपलाईन आदी कामे सुव्यवस्थितपणे झाली असतील तेथे सिमेंट रस्ते निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव द्या, कंत्राटदाराने देयक सादर केल्यावर महिनाभरात रक्कम अदा केली जाईल; तसे न झाल्यास दरमहा व्याजाचे पैसे कंत्राटदाराला दिले जातील, असे जाहीर करा, आदी सूचना त्यांनी या बैठकीत केल्यात.
स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या बाळापूरच्या एका अधिकाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे कसे सोपविले याबाबतची संघर्षगाथा गुडेवार यांनी जाणीवपूर्वक सांगितली. भ्रष्टाचार सोडणार नसाल तर तुम्हीही सुटणार नाही, असे संकेत त्यांनी या कथनातून दिलेत. मी स्वत:हून प्रकरणे शोधून काढत नाही; पण माझ्याकडे तक्रारी आल्या तर कुंडली काढल्याशिवाय राहत नाही, हेदेखील गुडेवार यांनी स्पष्ट केले.