हॉटेल रंगोली पर्लच्या वॉलकंपाऊंडवर हातोडा
By Admin | Updated: September 27, 2015 00:05 IST2015-09-27T00:05:51+5:302015-09-27T00:05:51+5:30
बडनेरा मार्गालगतच्या हॉटेल रंगोली पर्लद्वारा सार्वजनिक रस्त्यावर अनाधिकृत बांधकाम केलेले वॉलकम्पाऊंड शनिवारी सकाळी ६ वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारा पाडण्यात आले.

हॉटेल रंगोली पर्लच्या वॉलकंपाऊंडवर हातोडा
महापालिकेची कारवाई : उर्वरित अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस
अमरावती : बडनेरा मार्गालगतच्या हॉटेल रंगोली पर्लद्वारा सार्वजनिक रस्त्यावर अनाधिकृत बांधकाम केलेले वॉलकम्पाऊंड शनिवारी सकाळी ६ वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारा पाडण्यात आले. महापालिकेच्या या कारवाईमुळे हॉटेलच्या संचालक तथा नगरसेवकास ‘अनर्ह’ का ठरविण्यात येऊ नये, अशी नोटीस आयुक्तांनी बजावून १५ दिवसांत खुलासा मागविला आहे.
हॉटेल रंगोली पर्लचे रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी संचालकांनी दोन दिवसांचा अवधी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिला होता. संचालकांनी स्वत: अतिक्रमण काढले नाही तर ते शनिवारी काढले जाईल, असा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. महापालिका क्षेत्रातील सर्व्हे नं.६७, भूखंड क्रमांक ८/४ रंगोली टॉवर येथे मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनाधिकृत बांधकाम होते.
आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई
अमरावती : बांधकामापैकी रस्त्यावर अतिक्रमण असलेले वॉलकम्पाऊंड शनिवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आले.
आयुक्त गुडेवार यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता पोतदार, सहायक अभियंता दीपक खंडेकर, अतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, शाखा अभियंता घनश्याम वाघाडे. शाखा अभियंता मंगेश कडू, मनीष हिरोडे, उमेश सवाई, प्रितम रामटेके, पोलीस निरीक्षक खराते यांनी तीन जेसीबी व दोन ट्रक तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली.
असे आहे अनधिकृत बांधकाम
हॉटेल रंगोली पर्लमध्ये तळघर ६७३ चौरस मीटर, तळमजला २२७, पहिला मजला १४७, दुसरा मजला १५८, तिसरा मजला १५४, चौथा मजला १५४, पाचवा मजल्यावर १२५ चौरस मिटर बांधकाम अनाधिकृत असल्याने १५ दिवसांचे आत बांधकाम पाडावे. अन्यथा महापालिका कारवाई करेल, अशी नोटीस महापालिकेच्या दक्षिण झोन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांनी हॉटेलच्या संचालकाला शनिवारी बजावली आहे.
-तर अपात्रतेची कारवाई
महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम १० (१ ड) नुसार पालिका सदस्याने या अधिनियमाच्या किंवा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अन्वये तरतुदीचा भंग करून कोणतेही बेकायदेशीर किंवा अनधिकृत संरचनात्मक बांधकाम केले असेल किंवा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असेल किंवा अतिक्रमित बांधकाम पाडीत असताना शासकीय कर्तव्यावरील सक्षम प्राधिकाऱ्यास लेखी पत्र देऊन अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असेल तर असा पालिका सदस्य म्हणून राहण्यास अनर्ह ठरेल, असे प्रावधान आहे. असा संदर्भ देऊन हॉटेल संचालक देशमुख यांना आपणास कलम १० (१ ड) नुसार अनर्ह का करण्यात येऊ नये, अशी नोटीस आयुक्त गुडेवार यांनी बजावून १५ दिवसांत खुलासा मागविला आहे.
भूमिअभिलेख विभागाच्या मोजमापाविना महापालिकेने हॉटेलची वॉल कंपाऊंड तोडले. मला विचार करण्यासाठी वेळ दिला नाही. मला पूर्णपणे अंधारात ठेवून महापालिकेने ही कारवाई केलेली आहे. सदर कारवाई अयोग्य आहे. त्यामुळे मी याचा निषेध करतो.
- नितीन देशमुख,
संचालक, हॉटेल रंगोली पर्ल.