राज्यातील ५१ नागरी स्वराज्य संस्थांमध्ये ‘सर्वांसाठी घरे’
By Admin | Updated: December 12, 2015 00:18 IST2015-12-12T00:18:50+5:302015-12-12T00:18:50+5:30
राज्यातील ५१ नागरी स्वराज्य संस्थेत ‘सर्वांसाठी घरे’ ही योजना राबविण्यात येणार आहे.

राज्यातील ५१ नागरी स्वराज्य संस्थांमध्ये ‘सर्वांसाठी घरे’
अचलपूर, अमरावतीचाही समावेश : शौचालय सुविधा आवश्यक
अमरावती : राज्यातील ५१ नागरी स्वराज्य संस्थेत ‘सर्वांसाठी घरे’ ही योजना राबविण्यात येणार आहे. यात अमरावती शहरासह अचलपूर नगरपालिकेचा समावेश आहे.
सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी गृहनिर्माण विभागाने निर्देश काढलेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरुपात घरकूल बांधण्यासाठी अनुदान दिले जाईल. कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे घरे बांधताना शौचालय सुविधा आवश्यक केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील पात्र कुटुंबांना त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागेवर नवीन घरकूल बांधण्यास अथवा राहत्या घरी वाढ करण्यास केंद्र शासनाकडून दीड लाखांपर्यंत अनुदान दिले जाईल. यात राज्य शासन १ लाखांचे अनुदान देणार आहे. पात्र लाभार्थ्यांचा प्रस्ताव नागरी स्वराज्य संस्थांकडे दिल्यानंतर छाननी होईल व त्यानंतर ते प्रस्ताव राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समितीसमोर मान्यतेसाठी सादर होतील.