घरकूल योजना धनदांडग्यांच्या घशात

By Admin | Updated: August 7, 2016 00:12 IST2016-08-07T00:12:34+5:302016-08-07T00:12:34+5:30

गोरगरिबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सरकारने घरकूल योजना राबविली.

Homeowner's Planet | घरकूल योजना धनदांडग्यांच्या घशात

घरकूल योजना धनदांडग्यांच्या घशात

नियमबाह्य कामांना ऊत : काही ठिकाणची घरकुले गायब
अचलपूर : गोरगरिबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सरकारने घरकूल योजना राबविली. पण, या योजनेचा संबंधित अधिकारी व काही राजकीय नेत्यांच्या संगणमताने फज्जा उडवला गेला. नियमांना तिलांजली देऊन याचा लाभ नगरपालिकेचे कर्मचारी, धनदांडगे राजकीय पक्षाचे नेते यांचे आप्तस्वकीय असलेल्यांना मिळाला. गोरगरीब खरे लाभार्थी मात्र यापासून वंचित राहिले.
पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी खोटे दस्तऐवज सादर करून नातेवाईकांना घरकूल मिळवून दिले. कुणी स्वत: लाभ घेतला. काही घरकुले मंजूर नसलेल्या भागात बांधली असून काही ठिकाणची घरकूल गायब झाल्याची माहिती असून घरकूलाचे पैसे घेऊन त्यात आपल्या जवळचे पैसे टाकून भव्यदिव्य इमारती उभारल्यात. घरकुलासाठी असणारे दलाल कोट्यधीश झाले. असल्याची माहिती या घरकूल घोटाळयाची शासनाने उच्चस्तरीय चौकशी करुन घोटाळेबाजांना गजाआड करवे, अशी मागणी सर्वसातमान्य जनतेकडून होत आहे.
पालिकेच्या एका कर्मचाऱ्याने त्यांच्या पत्नीच्या नावे नियमबाह्य रितीन घरकूल उचलून शासनाची फसवणूक केल्याची बाब उघड झाली आहे. याबाबत नगरसेवक प्रफुल्ल महाजन यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावरही कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष.
अचलपूूर पालिकेत जनार्धन तुळशिराम गायकवाड हे प्लंबर फिटर या जागेवर कार्यरत आहेत. पगार बिलानुसार त्यांचा मासिक पगार ३२९०७ रुपये आहे. म्हणजे त्यांचे वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपये आहे. असे असताना त्यांनी शासनाच्या रमाई घरकूल योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी, तहसीलदार यांची फसवणूक करून खोटे वार्षिक उत्पन्नाचा दाखला प्रतिज्ञापत्र सादर करून १ लाख ५० हजार रुपयांचा बनवून आणला.
न.प.कर्मचारी गायकवाड व त्यांची पत्नी शोभा यांचे एकत्रित कुटुंब असून त्यांनी पत्नी शोभा हिच्या नावाने घरकूल मिळण्यासाठी उत्पन्नाचा खोटा दाखला, स्वत:च्या घराची टॅक्स असेसमेंटची प्रत, अर्जासोबत जोडली आहे. शोभा गायकवाड यांनी १६ जानेवारी २०१५ रोजी १०० रुपयांच्या स्टॅम्पवर लेखी शपथपत्र लिहून दिले, त्यात वार्षिक उत्पन्न २५ हजार रुपये असून दारिद्र्यरेषेखालील असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. रमाई घरकूल योजना अनुसूचित जातीमधील शासकीय नियमात मोडणाऱ्या सर्व समाजाकरीता आहे. परंतु त्यांनी जातीचे प्रमाणपत्र दिलेले नाही. त्याऐवजी मुलगी शीतल जनार्दन गायकवाड हिचे जात प्रमाणपत्र लावले. सदर अर्ज नगर पालिकेला प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने घरकूल मंजूर होते, असेही महाजन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
याबाबत मुख्याधिकारी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. तसेच जनार्दन गायकवाड यांचे मत घेण्याच्या प्रयत्न केला असता ते भेटू शकले नाहीत. (शहर प्रतिनिधी)

मी सध्या आजारी आहे. आताच दवाखान्यातून तपासणी करून व उपचार घेऊन आलो आहे. त्यामुळे मी या प्रकरणाविषयी काहीच माहिती देऊ शकत नाही.
- ओमप्रकाश रामावत,
अभियंता, नगर परिषद

मी या प्रकरणावर काहीच बोलू शकत नाही. कारण मी महत्त्वाच्या कामानिमित्त नागपूर येथे आलेलो आहे. त्यामुळे आॅफीसमध्ये पोहोचल्यावर बोलू.
- निरंजन जोशी,
नगर अभियंता, नगर परिषद

Web Title: Homeowner's Planet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.