‘क्लस्टर’ झोनमध्ये घरपोच रेशन धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:00:51+5:30
महापालिका आयुक्तांद्वारे हा भाग ेकंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला असल्याने या भागाच्या सर्व सीमा प्रशासनाने बंद केलेल्या आहेत. यामध्ये ही रेशन दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. दुसरीकडे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांतून अन्नधान्य रेशन दुकानांना प्राप्त होत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाद्वारे २८ एप्रिलला कटेंनमेंट झोनमधील १६ रेशन दुकानदारांची सभा घेण्यात आली.

‘क्लस्टर’ झोनमध्ये घरपोच रेशन धान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील ‘क्लस्टर झोन’मध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, रेशन दुकानांमध्ये गर्दी होऊ न देण्यासाठी १६ रेशन दुकानांच्या लाभार्थींकडे बुधवारपासून घरपोच रेशन धान्य देण्यात येत आहे. शहराच्या अन्नधान्य वितरण अधिकारी तथा तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या उपक्रमाला नागरिकांचे चांगले सहकार्य लाभले आहे.
महापालिका आयुक्तांद्वारे हा भाग ेकंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला असल्याने या भागाच्या सर्व सीमा प्रशासनाने बंद केलेल्या आहेत. यामध्ये ही रेशन दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. दुसरीकडे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांतून अन्नधान्य रेशन दुकानांना प्राप्त होत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाद्वारे २८ एप्रिलला कटेंनमेंट झोनमधील १६ रेशन दुकानदारांची सभा घेण्यात आली. यामध्ये रेशन दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या धान्याची घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
संचारबंदीच्या काळात नागरिकांच्या घरापर्यंत रेशन धान्य पोहचवून दिले जात असताना, कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी या पथकासोबत पोलीस बंदोबस्तदेखील राहणार असल्याचे तहसीलदार लबडे यांनी सांगितले.
या भागांमध्ये रेशन धान्याची होम डिलिव्हरी
कंटेनमेंट झोनमधील भाजीबाजार, खोलापुरीगेट, गौस नगर (२), रहमतनगर, छायानगर (३), ताजनगर, कमेला ग्राऊंड, हातीपुरा, हैदरपुरा व तारखेडा (३) येथील तीन दुकानांच्या लाभार्थींना ही घरपोच सेवा देण्यात येत आहे. अंत्योदय व केशरी कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्काचे रेशन मिळावे, यासाठी पुरवठा विभागाद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.