गृहराज्यमंत्र्यांनी मागविले खापर्डेवाड्याचे फाईल
By Admin | Updated: November 17, 2015 00:19 IST2015-11-17T00:19:30+5:302015-11-17T00:19:30+5:30
श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा राजकमल येथील वाडा ऐतिहासिक वास्तू म्हणून महानगरपालिकेने संपादित करावी,...

गृहराज्यमंत्र्यांनी मागविले खापर्डेवाड्याचे फाईल
राणांनी दिले पत्र : महापालिकेने वास्तू संपादित करावी
अमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा राजकमल येथील वाडा ऐतिहासिक वास्तू म्हणून महानगरपालिकेने संपादित करावी, अशी मागणी आ. रवी राणा यांनी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांना दिलेल्या पत्रातून केली.
गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना आदेश देवून या प्रकरणांची फाईल तत्काळ मागविणार आहे. खापर्डेवाडा हे अंबानगरीचे वैभव असून त्याचे जतन करणे हे गरजेचे आहे. या संदर्भाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल, असेही यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आ. रवी राणा यांना सांगितले. ख्यातनाम वकील दादासाहेब खापर्डे यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान आहे. या वाड्याला स्वातंत्र्य चळवळीतील अनेक देशभक्तांचे व संतांचे पद्स्पर्श लाभले आहे.
येथे शेगावीचा योगी श्री संत गजानन महाराज काही काळ वास्तव्याला होते. या ऐतिहासिक वाड्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, वि.दा. सावरकर, अरविंद घोष, अॅनी बेंझट, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. केशवराव हेगडेवार, डब्ल्यू.सी. बॅनर्जी आदी देशभक्तांनी व महापुरुषांनी भेटी दिल्या आहेत. आपण लवकरच शासन दरबारी हा ऐतिहासिक वाड्याचे जतन करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविणार आहो. त्याकरिता या प्रकरणांची आयुक्तांकडून फाईल मागविणार असल्याचे यावेळी रणजित पाटील यांनी सांगितले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य ही या प्रकरणासाठी प्रयत्न करीत आहेत. यावेळी आ. रवी राणासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)