गृहकर्ज स्वस्त झाले, पण बांधकाम साहित्य महाग; सर्वसामान्याच्या घराचे स्वप्न कधी साकार होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:12 IST2021-07-28T04:12:45+5:302021-07-28T04:12:45+5:30
वाळू साठेबाजीला उधाण, चढ्या दरात विक्री, मातीच्या विटांमध्येही दोन हजार रुपयांची वाढ अमरावती : प्रत्येक व्यक्ती स्वत:चे घर साकारण्यासाठी ...

गृहकर्ज स्वस्त झाले, पण बांधकाम साहित्य महाग; सर्वसामान्याच्या घराचे स्वप्न कधी साकार होणार?
वाळू साठेबाजीला उधाण, चढ्या दरात विक्री, मातीच्या विटांमध्येही दोन हजार रुपयांची वाढ
अमरावती : प्रत्येक व्यक्ती स्वत:चे घर साकारण्यासाठी धडपडत असतो. हीच गरज लक्षात घेऊन घराचे स्वप्न साकार करता यावे, याकरिता राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गृहकर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी स्पर्धा लागली आहे. बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर कमी केले, पण बांधकामाकरिता आवश्यक असलेल्या इतर साहित्याच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे कर्ज सहज उपलब्ध होत आहे, मात्र साहित्य महागल्याने अनेकांचे स्वप्न अर्धवटच राहत आहे.
बॉक्स
शहरापासून दूर घरे स्वस्त, पण वाहतुकीवर खर्च जास्त
शहरालगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ले-आऊट पाडून तेथे काही बिल्डरांकडून घरांचे किंवा सदनिकांचे बांधकाम केले जात आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील घरांच्या किमती कमी असून, त्या भागात ये-जा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. शहरापासून लांब असलेल्या या भागामध्ये पुरेशा सुविधा नसल्याने घराचे बांधकाम केल्यानंतरही त्या सुविधा पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे घरे स्वस्त असली तरीही ये-जा करण्याकरिता खर्च करावा लागतो.
कोट
घर घेणे दिवास्वप्नच
घर घेण्याकरिता बँकांकडून गृहकर्ज सहज उपलब्ध होत आहे. बँकांनी व्याजदरही कमी केले आहेत. परंतु घरासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या किमती भरमसाठ वाढल्याने घराच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांना घर घेणे दिवास्वप्नच ठरत आहे.
- राजेश सपकाळे
सर्वच बाबतीत सध्या महागाईचा भडका उडाला आहे. बँकांकडून सर्व सुविधा मिळत आहेत. कर्जही झटपट मंजूर करायला तयार आहे. परंतु, प्लॉटच्या भावासह बांधकामासाठी आवश्यक साहित्याच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. सात हजार रुपयांची वाळू आता साठेबाजी करून १६ हजार रुपयांत दोन ब्रास दराने विकली जात आहे.
- प्रवीण कस्तुरे
कोट
साहित्य विक्रेते म्हणतात
कोरोनाकाळामध्ये वीटभट्टीकरिता लागणाऱ्या साहित्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे विटांचा दर आता सहा हजार रुपये प्रतिहजार झाला आहे. हा दरही आम्हाला परवडणारा नाही. पण, व्यवसाय टिकवायचा असल्याने नफा तसेच तोटाही सहन करावा लागतो.
- ईसराईल खान
बांधकामाकरिता गिट्टीची आवश्यकता असते. परंतु, शहरालगतच्या मासोद येथील गिट्टी खदानीवर पावसाचा व्यत्यय येत आहे. गिट्टीची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी २० रुपये फूट मिळणारी गिट्टी आता ३० रुपये फुटाने विकावी लागत आहे. यात ग्राहकांनाही फटका बसत आहे.
- प्रकाश दातार
बॉक्स
बांधकाम साहित्यात स्वस्ताई नाहीच
साहित्य परिमाण २०१८ २०१९ २०२० २०२१
सिमेंट प्रतिबॅग २८० २९० ३०० ३६५
विटा दरहजारी ४००० ४५०० ५५०० ८०००
वाळू ३०० फूट ७००० ८००० १०००० १६०००
गिट्टी प्रतिफूट १६ २० २१ ३०
पोलाद प्रतिकिलो ४० ४२ ३७ ५८